Join us  

येऊ कशी तशी मी नांदायला फेम निखिल राऊत स्ट्रगल काळात राहायचा फुटपाथवर, आता आहे मुंबईत स्वतःचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 6:00 AM

निखिलने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दूध टाकणे, छोट्या मोठ्या नोकऱ्या करणे यांसारखी कामे करायला लागली.

ठळक मुद्देनिखिलने मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे चांगलेच बस्तान बसवले असले तरी त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूपच स्ट्रगल करावा लागला.

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेला खूपच कमी काळात प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या मालिकेत मोहितच्या भूमिकेत आपल्याला निखिल राऊतला पाहायला मिळत आहे. 

निखिलने मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे चांगलेच बस्तान बसवले असले तरी त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूपच स्ट्रगल करावा लागला. त्याने हे यश मिळवण्यासाठी प्रचंड स्ट्रगल केला आहे. तो मुळचा पुण्याचा असून त्याच्या घरातील कोणाचाच चित्रपटसृष्टीशी संबंध नाहीये. पण त्याला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. चित्रपटसृष्टीतच करियर करायचे असे त्याने तेव्हाच ठरवले होते. आपण मोठे होऊन अभिनेता व्हायचे असे निखिलने ठरवले असले तरी अचानक त्याच्या वडिलांची नोकरी केली आणि घराची आर्थिक परिस्थिती ढासळली. त्यामुळे त्याने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दूध टाकणे, छोट्या मोठ्या नोकऱ्या करणे यांसारखी कामे करायला लागली.

निखिल एका प्युरिफायर कंपनीत कामाला होता. कामानिमित्त पुण्यातील एका गृहस्थांच्या घरी तो दुपारच्या वेळात गेला होता. दुपार असल्याने त्या घरातल्या काकू झोपल्या होत्या. त्यांनी त्यावेळी अतिशय वाईट शब्दांत निखिलचा अपमान केला होता. निखिल त्यावेळी रडतच तिथून बाहेर पडला आणि त्या दिवशीच त्याने आपण ही नोकरी सोडून अभिनेता बनण्याच्या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचे ठरवले. हाच त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता.

त्यानंतर निखिल प्रोडक्शन हाऊसमध्ये जे काही काम मिळेल ते करू लागला. एका कार्यक्रमाचा स्पॉटबॉय म्हणून काम करत असतानाच त्याला त्याच कार्यक्रमात सहसूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्याच्या या स्ट्रग्लविषयी तो सांगतो, अभिनेता बनायचे असे मी ठरवले असल्यामुळेच मी संधीच्या शोधात पुण्यातून मुंबईत आलो. सुरुवातीला मी मुंबई-पुणे असा प्रवास रोज करायचो. पण सतत ऑडिशन देत असल्याने काही वेळा मला मुंबईतच राहावे लागत असे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण मी दादरच्या फुटपाथवर रात्री झोपायचो. सकाळी सुलभ शौचालयामध्ये आंघोळ करायचो. एखादी छोटीशी भूमिका साकारायला मिळाली तरी काम करायचो. पण नंतरच्या काळात मला काही चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि माझ्या आय़ुष्याला कलाटणी मिळाली. महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाने तर मला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. आज माझ्या मेहनीतीने मुंबईतील वांद्रे येथे काही वर्षांपूर्वी मी माझे स्वतःचे घर घेतले आहे. 

टॅग्स :निखिल राऊत