Join us  

भलत्याच कलाकाराचा झाला गौरव, झी मराठी पुरस्कार सोहळ्यावर प्रेक्षकांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 5:11 PM

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा बोलबाला राहिल्याचे पाहायला मिळाले. कारण सगळ्यात जास्त पुरस्कार याच मालिकेने पटकावले होते.

नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा पार पडला. हा पुरस्कार सोहळा आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. पुरस्कार योग्य कॅटगीरीनुसार दिले गेले नसल्याच्या सध्या चर्चा आहेत. या पुरस्कार सोहळ्यात  'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा बोलबाला राहिल्याचे पाहायला मिळाले. कारण सगळ्यात जास्त पुरस्कार याच मालिकेने पटकावले होते. प्रार्थना बेहरेला एकूण तीन पुरस्काराने गौरवण्यात आले तर  संकर्षण कऱ्हाडेलासुद्धा तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले तर बालकलाकार म्हणून मायराला आणि मैत्रीचा पुरस्कार यश आणि समीर यांना दिला गेला. विशेष म्हणजे मानसी मागिकर आणि मोहन जोशी यांना देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर शेफालीच्या भूमिकेला देखील पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने पुरस्कार मिळवण्यात बाजी मारली. 

तर दुसरीकडे भावी सून, भावी सासू अशी सुद्धा कॅटेगिरी पुरस्कारासाठी ठेवण्यात आली होती. ही कॅटेगिरी बघून प्रेक्षकच गोंधळात पडल्याचे पाहायला मिळाले. भावी सून म्हणून स्वीटूला हा पुरस्कार मिळाला तर भावी सासू म्हणून ओमच्या आईला म्हणजेच शकूला पुरस्कार दिला गेला. मुळात इथे प्रश्न हा निर्माण होतो की, स्वीटूचे लग्न हे ओम बरोबर झाले असते तर स्वीटू शकूची सून झाली असती. पण आता ट्रॅकप्रमाणे तिचे लग्न मोहितसोबत झाले आहे. मग या पुरस्कारासाठी स्वीटू मानकरी कशी ? या कॅटेगिरीसाठी पुरस्कार द्यायचाच होता तर तो 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेतील आदीतीला द्यायला हवा होता.  भावी सासू म्हणून सिद्धूच्या आईला हा पुरस्कार देणे योग्य राहिले असते.

भावी सासू किंवा चर्चेत असलेला चेहरा म्हणून 'मन उडू उडू झालं' या मालिकेतील दिपूदेखील योग्य ठरली असती.पुरस्कारासाठी इतर मालिकांना कुठे तरी डावलले गेल्याचे प्रेक्षकांनीच मतं व्यक्त केले आहे. मुळात प्रेक्षकांच्या आवडत्या आणि ज्या कलाकाराला पसंती दिली होती. त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाच नसल्याने प्रेक्षक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.