Join us  

इच्छा नसूनही राणाला करावे लागणार हे काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 3:03 PM

ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे या मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा गाठला तसेच टीआरपीचे नवे उच्चांक गाठले. शिक्षणाचं महत्व जाणणारी पाठक बाई आणि रांगड्या मातीत कुस्ती खेळून व काळ्या मातीत सोनं पिकवून मातीशी नाळ जोडलेला असलेला राणादा यांच्या व्यक्तिरेखेबाबती फिरणारे कथानक असलेल्या या मालिकेतील पाठक बाई आणि राणादा सोबतच प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून  आहे.

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की नंदिताच्या कारस्थानामुळे राणाला लीग कुस्ती मॅचचं कॉन्ट्रॅक्ट साईन करावं लागतं. मनात नसताना देखील फक्त घरच्यांचा शब्द पाळण्यासाठी राणा मॅटवरची कुस्ती खेळायला तयार होतो. आगामी भागात राणाला मॅटवरच्या कुस्तीसाठी ट्रेन करण्यासाठी कोचला पाठवण्यात येतं. पण कोचसोबत राणाचं गणित जुळत नाही. म्हणून अखेर राणासाठी एक मॅनेजर पाठवायचं ठरतं. राणा मॅनेजरच्या स्वागतासाठी तयार झाल्याचे पाहायला मिळणार आहे. मॅनेजरची एण्ट्री होते आणि राणा पळ काढतो. मॅनेजर म्हणून बाईमाणूस आल्याने राणाची पळापळ प्रेक्षक महाएपिसोडमध्ये अनुभवू शकतील. या सर्व प्रसंगामुळे राणाच्या आयुष्याला एक अनपेक्षित कलाटणी मिळणार आहे इतकं मात्र नक्की. आयुष्याच्या आखाड्यात अनपेक्षित व्यक्तीसमोर कसा निभाव लागेल राणाचा? मनाविरुद्ध खेळत असलेल्या मॅटवरील कुस्तीत राणा यशस्वी ठरेल का? नंदिता तिच्या कट-कारस्थानांमध्ये यशस्वी होईल का? याची उत्तरं प्रेक्षकांना महाएपिसोडमध्ये मिळतील.

जाणून घ्या राणाचा फिटनेस फंडा 

ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. त्याचा फिटनेस फंडा शेअर करताना राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला, "मी शूटिंग संपल्यानंतर नियमितपणे जिमला जातो. जिमला जाणं मी कधीच टाळत नाही तसेच वर्कआऊट करताना मी एकाच अवयवावर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण शरीराचा व्यायाम करतो. चपळपणासाठी मी योगा देखील करतो त्यामुळे शरीराला स्टिफनेस येत नाही. तसेच तालमीचे सिन शूट करताना सूर्यनमस्कार करावे लागतात तसेच डीप्स मारावे लागतात त्यामुळे हे व्यायाम जास्त करण्याकडे माझा भर असतो. हा झाला व्यायामाचा भाग, पण त्यासोबतच डाएट करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. राणादा हा एक पेहलवान असल्यामुळे त्याची शरीयष्टी ऑनस्क्रीन चांगली दिसली पाहिजे म्हणूनच व्यायामासोबत डाएटवर देखील मी कटाक्षाने लक्ष देतो. माझ्या रोजच्या आहारात पाव लिटर दूध, १ लिटर ताक, १५-२० अंडी आणि मांसाहार यांचा समावेश असतो." राणादा या व्यक्तिरेखेला सुंदररित्या साकारण्यासाठी हार्दिक घेत असलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. 

टॅग्स :तुझ्यात जीव रंगला