Join us  

‘तुझसे है राबता’मध्ये भाषेची अदलाबदल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 2:32 PM

सेहबान हा सविता आणि पूर्वा यांना उर्दू भाषा आणि त्यातील काही किचकट शब्द कसे उच्चारावेत, याचे धडे देत असून सविता आणि पूर्वा या दोघी सेहबानला त्याच्या मल्हार राणे या मराठी पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेसाठी एक अस्सल मराठी मुलगा कसा वागेल, त्याचे टीप्स देत असतात.

छोट्या पडद्यावरील ‘तुझसे है राबता’ या मालिकेतील कल्याणी (रीम शेख), अनुप्रिया (पर्वा गोखले) आणि मल्हार राणे (सेहबान अझीम) या प्रमुख व्यक्तिरेखांच्या अप्रतिम भूमिकांमुळे ही मालिका रसिकांमध्ये आपली लोकप्रियता दिवसेंदिवस उंचावत चालली आहे. मन गुंतवून ठेवणा-या मालिकेच्या कथानकामुळे रसिक या मालिकेला पंसती दर्शवत आहे. आगामी भागांमध्ये मल्हारला पोलिस ठाण्यात कबुली जबाबावर स्वाक्षरी करण्यापासून रोखताना कल्याणी दिसेल.

 

या दैनंदिन मालिकांच्या प्रचंड प्रदीर्घ चित्रीकरणाच्या वेळापत्रकामुळे या कलाकारांना आपल्या कुटुंबियांपासून दीर्घकाळ दूर राहावे लागत असते. त्यामुळे हे कलाकार सेटवर एकमेकांचा समावेश असलेले आपले स्वत:चे विस्तारित कुटुंब तयार करतात. दोन प्रसंगांच्या चित्रीकरणामधील मोकळ्या वेळेत या मालिकेतील रीम शेख, पूर्वा गोखले, सविता प्रभुणे आणि सेहबान अझीम हे कलाकार एकमेकांना आपली भाषा शिकविताना दिसतात. सेहबान हा सविता आणि पूर्वा यांना उर्दू भाषा आणि त्यातील काही किचकट शब्द कसे उच्चारावेत, याचे धडे देत असून सविता आणि पूर्वा या दोघी सेहबानला त्याच्या मल्हार राणे या मराठी पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेसाठी एक अस्सल मराठी मुलगा कसा वागेल, त्याचे टीप्स देत असतात.

 

सेहबान सांगतो, “दोन प्रसंगांमधल्या मोकळ्या वेळेत आम्ही एकमेकांना आपापल्या भाषेचे धडे देत असतो. पूर्वा आणि सविताजी यांनी मला आणि रीम शेखला काही गुंतागुंतीच्या मराठी शब्दांचे उच्चार आणि अर्थ शिकविण्याचं ठरविलं, तेव्हा त्यांच्या या उपकाराची परतफेड मी त्यांना उर्दूतील काही शब्द आणि त्यांचे उच्चार शिकवून करीत आहे. मी त्यांना बेगम, नुख्तार आणि खौफ यासारखे काही शब्द कसे उच्चारायचे ते सांगितलं. त्यांना एक नवी भाषा शिकविताना मला मजा येत होती आणि त्यांच्याकडूनही मराठी शिकताना मला आनंद होत होता.”

पूर्वा म्हणाली, “आमच्या मालिकेच्या कथानकाची पार्श्वभूमी एक मराठी कुटुंब आहे; त्यामुळेच सर्व कलाकार आणि सेटवरील  कर्माचा-यांना मराठी भाषा आणि तिच्या संस्कृतीविषयी थोडीफार तरी माहिती असणं गरजेचं आहे, असं आम्हाला वाटलं. सेहबान आणि रीम शेख यांना मराठी शिकविताना आम्हाला फारच मजा येत होती. पण एखाद्या हुशार विद्यार्थ्याप्रमाणे या दोघांनी अनेक मराठी शब्दांचे उच्चार पटापट आत्मसात केले. जीवनात काहीही नवं शिकण्यासाठी आपण नेहमी तयारच असतो.” वेळेचा सदुपयोग कसा करावा, हे या मंडळींकडून शिकले पाहिजे असे त्याने म्हटले आहे.