म्हणून कृतिका कामरा आणि गौरव खन्ना गोवळकोंड्य़ाच्या किल्ल्यात दाखल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 14:53 IST
‘लाईफ ओके’वरील ‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ मालिकेच्या प्रोमोंनी प्रेक्षकांमध्ये जागृत केलेली उत्कंठा कायम राखण्यासाठी या मालिकेचे निर्माते प्रयत्नांची पराकाष्ठा ...
म्हणून कृतिका कामरा आणि गौरव खन्ना गोवळकोंड्य़ाच्या किल्ल्यात दाखल!
‘लाईफ ओके’वरील ‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ मालिकेच्या प्रोमोंनी प्रेक्षकांमध्ये जागृत केलेली उत्कंठा कायम राखण्यासाठी या मालिकेचे निर्माते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून ही मालिका या वाहिनीवरील आजवरची सर्वात मोठी मालिका ठरेल, अशी चिन्हे आहेत. मालिकेची निर्मिती निखिल सिन्हा यांनी केली असून त्यांनीच मालिकेच्या प्रारंभीच्या भागांचे दिग्दर्शनही केले आहे. आता या मालिकेच्या विशेष भागाचे चित्रीकरणासाठी प्रमुख अभिनेते आणि कर्मचारी हैदराबादला गेल्याने या मालिकेच्या चित्रीकरणाचे शूटिंग जोरात सुरू आहे. या मालिकेला भव्यता देण्यासाठी तिच्या प्रारंभीच्या भागाचे चित्रीकरण गोवळकोंड्य़ाच्या किल्ल्यात होणार असून त्यासाठी मालिकेतील कृतिका कामरा, गौरव खन्ना आणि सुदेश बेरी हे कलाकार नुकतेच हैदराबादला गेले होते. निखिल सिन्हा यांच्या ‘सिया के राम’ या अखेरच्या मालिकेचे चित्रीकरणही हैदराबादमध्ये झाले असल्याने त्यांचे या शहराशी चांगले नाते निर्माण झाले आहे.या आऊटडोअर चित्रीकरणासंदर्भात गौरव खन्नाकडे विचारणा केली असता त्याने सांगितले, “हो, आम्ही हैदराबादजवळच्या गोवळकोंड्य़ाच्या गुंफांमध्ये चित्रीकरण करणार आहोत. हा मालिकेचा पहिला प्रसंग असेल. मीसुध्दा हैदराबादमध्ये प्रथमच आलो आहे. आम्ही सध्या जिथे चित्रीकरण करीत आहोत, ती जागा अतिशय सुंदर असल्याने आमच्या उत्साहाला उधाण आलं आहे. आमच्या मालिकेच्या ऐतिहासिक काळाला साजेसा हा किल्ला आहे. तसंच स्वत:निखिल सिन्हाच या भागाचं दिग्दर्शन करीत असल्याने प्रेक्षकांसाठी ती नेत्रपर्वणीच असेल, यात शंका नाही.”1990 साली दूरदर्शनवर चंद्रकांताही मालिका हिट ठरली होती.या मालिकेत शीखा स्वरूपने चंद्रकांताच्या भूमिकेने सा-यांची मनं जिंकली होती.शीखा स्वरूपने रंगवलेल्या चंद्रकांताची तीच जादु पसरवण्यासाठी अभिनेत्री कृतिका कामरा सज्ज झालीय. ब-याच दिवसांपासून चंद्रकांता विषयीच्या बातम्या रसिकांच्या कानी पडत होत्या. मात्र आता 4 मार्चला ही कृतिका कामराच्या रूपात चंद्रकांता मालिका पाहता येणार आहे.देवकीनंदन खत्री यांच्या ‘चंद्रकांता’ या विलक्षण लोकप्रिय कादंबरीवर आधारित ‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ या मालिकेतील भूमिकेद्वारे प्रसिध्द अभिनेत्री कृतिका कामरा ही टीव्ही मालिकांमध्ये परतत असून त्यात ती राजकन्येची भूमिका साकारीत आहे.