Join us  

​तनुजा मुखर्जी आरंभ या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2017 6:11 AM

तनुजा मुखर्जी यांनी ज्वेलथीफ, दो चोर, मेरे जीवन साथी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या गेली अनेक वर्षं ...

तनुजा मुखर्जी यांनी ज्वेलथीफ, दो चोर, मेरे जीवन साथी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या गेली अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आता त्या आरंभ या मालिकेत झळकणार आहेत. या मालिकेद्वारे तनुजा मुखर्जी छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. त्या या मालिकेत हाहुमा या द्रविडांच्या सर्वोच्च धार्मिक गुरूची भूमिका साकारणार आहेl. या भूमिकेविषयी तनुजा सांगतात, या मालिकेतील भूमिका अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मालिकेतील माझ्या व्यक्तिरेखेची खूपच चांगल्या रितीने आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेचा मी भाग झाल्याबद्दल मी आनंदी आहे.बाहुबली 2 या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद ही मालिका सादर करणार असून ही एक भव्य ऐतिहासिक मालिका आहे. या मालिकेत दोन संस्कृतींमधील संघर्षाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोन्ही संस्कृती आपापल्या अस्तित्वासाठी एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. भारतीय उपखंडावर द्रवीड संस्कृतीचे अधिराज्य होते. त्या काळातील ही कथा आहे. पश्चिमेकडील प्रदेशातील आर्यांची भटकी जमात ही एका सुपीक जमिनीच्या शोधात होती. त्यांना सप्तसिंधूच्या सुपीक प्रदेशाची चांगलीच माहिती ठाऊक होती. पण तेव्हा द्रविड संस्कृती या सुपीक प्रदेशात पूर्णपणे प्रस्थापित झाली होती. परंतु आपल्या संस्कृतीचे बस्तान बसवण्यासाठी आर्यदेखील अशाच सुपीक प्रदेशाच्या शोधात होते. आर्यांना आजवर कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळाली नव्हती. आर्यांची जमात खडतर प्रदेशात अनेक वर्षांपासून जीवन जगत होती आणि जगण्यासाठी संघर्ष करणे हाच त्यांचा धर्म होता. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि जगण्यासाठी विविध प्रदेशात जाणे, शिकार करणे आणि नवी भूमी प्राप्त करणे हेच त्यांचे जीवितकार्य होते. परंतु हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी ते उतावीळ झाले होते. स्थिर जीवनासाठी लागणारे भरपूर पाणी, उत्तम हवामान आणि वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य पिकवणारी जमीन यांच्या ते शोधात होते. त्यांना अशी जमीन सापडलीदेखील होती. पण या जमिनीवर दुसऱ्या संस्कृतीचे वर्चस्व होते. त्यामुळे अशी भूमी मिळताच त्यांनी त्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी संघर्ष छेडला. द्रविडांच्या मातृसत्ताक संस्कृतीत देवसेनेचा म्हणजेच कार्तिका नायरचा जन्म झाला होता आणि ती त्यांची भावी समाज्ञी होती. पण तिला स्वतःला मुक्त, स्वच्छंदी जीवन प्रिय होते. राणी या नात्याने द्राविडींच्या सुरक्षेची जबाबदारी तिच्यावर होती. या संघर्षाच्या काळात देवसेनेची गाठ वरुणदेव म्हणजेच रजनीश दुग्गलशी पडते. आर्यांच्या लोकशाही व्यवस्थेत संघर्ष करून वरुणदेव उच्चपदाला पोहोचलेला असतो. जगाच्या इतिहासातील या दोन बलाढ्य संस्कृतीतील संघर्षाचे चित्रण या मालिकेत केले आहे. पण हे दोन योद्धे नियतीने त्यांच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, याबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यांची कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे.