तनुजा गोल्डी बेहलच्या आरंभ या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 18:09 IST
सत्तर, एेंशीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. तनुजा यांनी हाथी मेरे साथी, दो ...
तनुजा गोल्डी बेहलच्या आरंभ या मालिकेत
सत्तर, एेंशीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. तनुजा यांनी हाथी मेरे साथी, दो दूने चार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही वर्षांपूर्वी पितृऋण या मराठी चित्रपटातदेखील त्या झळकल्या होत्या आणि आता त्या आरंभ या मालिकेत दिसणार आहेत. छोट्या पडद्यावर काम करण्याची तनुजा यांची ही पहिलीच वेळ आहे. तनुजा यांच्या मुली काजोल आणि तनिषा मुखर्जीदेखील अभिनयक्षेत्रात आहेत. काजोल हे आज हिंदी इंडस्ट्रीतील खूप मोठे नाव आहे. पण काजोल छोट्या पडद्यावर कधीच झळकली नाही. काजोल छोट्या पडद्यापासून दूर राहिली असली तरी तनुजाची लहान मुलगी तनिषाने बिग बॉस या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमामुळे तिच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. तनिषानंतर तिची आई तनुजा छोट्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झाली आहे.लवकरच सुरू होणाऱ्या आरंभ या मालिकेत ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेत आर्यन आणि द्राविडी संस्कृती आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा कालखंड हा फार पूर्वीच्या काळाचा आहे. या मालिकेची कथा ही के.व्ही. विजयेंद्र यांनी लिहिली आहे. विजयेंद्र यांनी बाहुबली ः द बिगिनिंग आणि बजरंगी भाईजान यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटाचे पटकथालेखन केले आहे. या मालिकेचे दिग्दर्शन गोल्डी बहेल करणार आहे. गोल्डी या मालिकेद्वारे दिग्दर्शक म्हणून छोट्या पडद्यावर आमगन करत आहे. आरंभ या मालिकेत तनुजाची भूमिका काय असणार याची अद्याप काही माहिती मिळाली नसली तरी त्यांची या मालिकेतील भूमिका ही खूप वेगळी आणि अतिशय महत्त्वाची असणार असल्याची चर्चा आहे.