Join us  

नट्टू काकाची भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक यांना झाला कर्करोग, सुरू आहे किमोथेरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 5:53 PM

घनश्याम नायक यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एक सर्जरी करण्यात आली होती. त्यांच्या घशातून गाठी काढण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देघनश्याम नायक यांनी नुकतेच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेसाठी चित्रीकरण केले.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत जेठालालच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाची देखभाल नट्टू काका आणि बाघा अनेक वर्षांपासून करत आहेत. हे दोघे या दुकानाचे आधारस्तंभ आहेत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. नट्टू काका तर हे दुकान सुरू झाल्यापासूनच या दुकानात काम करत आहेत. ही भूमिका घनश्याम नायक साकारत असून त्यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एक सर्जरी करण्यात आली होती. त्यांच्या घशातून गाठी काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून ते चित्रीकरण करत नव्हते. पण आता त्यांना कर्करोगाची लागण झाली असून त्यावर उपचार सुरू आहेत.

घनश्याम नायक यांचा मुलगा विकासने एका हिंदी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले की,  एप्रिलमध्ये त्यांच्या गळ्याचे पोझीट्रॉन एमिशन टोमोग्राफी स्कॅनिंग केले गेले तेव्हा त्यात काही स्पॉट दिसले. आता त्यांच्यावर किमोथेरपी सुरू आहे. पुढील काळात पीईटी स्कॅन करून त्यांचे स्पॉट बरे झाले का हे पाहाण्यात येईल.

घनश्याम नायक यांनी नुकतेच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेसाठी चित्रीकरण केले. यासाठी ते दमण आणि गुजरातला गेले होते. घनश्याम नायक यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांना खरी लोकप्रियता ही तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळेच मिळाली. या मालिकेतील नट्टू काका हे पात्र प्रचंड प्रसिद्ध आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका होती. पण त्यांच्या पहिल्याच मालिकेने त्यांना खूप फेमस बनवले. आज जेठालाल, दया, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक मेहता, अंजली, अय्यर, बबिता, टप्पू, पोपटलाल, नट्टू काका या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा