Join us  

कोरोना पॉझिटीव्ह वडिलांना घेऊन वणवण भटकत राहिला ‘टप्पू’; सांगताना धाय मोकलून रडली आई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 7:05 PM

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम टप्पू अर्थात भव्या गांधीच्या वडिलांचे काल कोरोनामुळे निधन झाले. त्याआधी टप्पूच्या कुटुंबाने जे भोगले, ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये...

ठळक मुद्देत्यांनी सांगितले, मी हातपाय जोडले आणि त्यांना भरती केले. तेथे 15 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अखेर ते आम्हाला सोडून गेलेच...

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भव्या गांधीच्या (Bhavya Gandhi) वडिलांचे काल कोरोनामुळे निधन झाले. पापाच्या निधनामुळे टप्पूला मोठा धक्का बसला आहे. वडिलांना कोरोना झाल्यावर त्यांच्या उपचारासाठी टप्पूला वणवण भटकावे लागले. खूप प्रयत्नानंतर त्यांना कोकिळाबेन रूग्णालयात बेड मिळाला. पण काल 11 मे रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.गेल्या महिनाभरात टप्पूच्या कुटुंबाने खूप काही भोगले. भव्या गांधीची आई यशोदा गांधी यांनी रडत रडत आपबीती सांगितली, स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत भव्याच्या आईने जे काही सांगितले ते धक्कादायक आहे.

अचानक ताप भरला आणि़...यशोदा गांधी व भव्या गांधी या मायलेकांनी गेल्या महिनाभरात भोगलेल्या वेदना आणि मनस्ताप कोणाच्याही वाट्याला येऊ नये. यशोदा यांना सांगितले की, गेल्या वर्षी कोरोना काळापासून माझे पती स्वत:ची अतिशय काळजी घेत होते. पण तरीही व्हायरसने त्यांना गाठलेच. महिनाभरापूर्वी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. लक्षणे नव्हती. पण त्याचदिवशी तापही भरला. छातीत दुखत होते. आम्ही छातीचे स्कॅनिंग केले. त्यांच्या छातीत 5 टक्के संसर्ग झालेला आढळला, डॉक्टरांनी घाबरण्याचे कारण नाही असे सांगून उपचार सुरू केला. घरातच आयसोलेशनमध्ये राहून त्यांनी उपचार घेतले. पण फायदा झाला नाही. आम्ही पुन्हा सीटी स्कॅन केले आणि त्यांचे इन्फेक्शन दुप्पट झाल्याचे आम्हाला कळले. आता त्यांना रूग्णालयात भरती करण्याची वेळ आली होती.

आम्ही मायलेक वणवण भटकलो...भव्या आईने सांगितले की, आम्ही त्यांना रूग्णालयात भरती करण्यासाठी वणवण भटकलो. ज्या रूग्णालयात फोन करायचो, तिथून नकार मिळायचा. आधी बीएमसीत नोंदणी करा, नंबर येईल तेव्हा रूग्णालय मिळेल, असे आम्हाला सांगण्यात आले. भव्याच्या मॅनेजरच्या मदतीने दादरच्या एका रूग्णालयात बेड मिळाला. येथे भव्याचे पापा दोन दिवस अ‍ॅडमिट होते. पण आता त्यांना आयसीयू बेडची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्या रूग्णालयात आयसीयू बेड नव्हता. आयसीयू बेड शोधण्यासाठी मला कमीत कमी 500 कॉल करावे लागले. नेत्यांपासून तर एनजीओंपर्यंत कॉल केलेत पण बेड मिळाला नाही़. आम्ही लाचार होतो. परमेश्वराच्या कृपेने माझ्या एका मित्राच्या मदतीने गोरेगावातील एका छोट्याच्या रूग्णालयात एक बेड मिळाला. पण आमचा संघर्ष थांबला नाही. माझ्या मोठ्या मुलाला आणि सूनेलाही कोरोना झाला. त्यांच्यासाठी मला घरी राहणे भाग होते. एकटा भव्या पापासाठी एका रूग्णालयातून दुस-या रूग्णालयात धावत होता.

मोजले दुप्पट पैसेपुढे त्यांनी सांगितले, डॉक्टरांनी आम्हाला रेमडेसिवीरची व्यवस्था करायला सांगितली. मी 6 इंजेक्शनसाठी 8 इंजेक्शनचे पैसे मोजलेत. दुबईवरून एक इंजेक्शन मागवले. त्या 45 हजाराच्या इंजेक्शनसाठी 1 लाख मोजलेत. अखेर आम्ही भव्याच्या वडिलांना कोकिळाबेन रूग्णालयात नेले. आधी  त्यांनीही भरती करण्यास नकार दिला. पण माझा नवरा शुद्धीत नव्हता. व्हेन्टिलेटवर होता. अशास्थितीत मी त्यांना कुठे घेऊन जाणार होते? मी हातपाय जोडले आणि त्यांना भरती केले. तेथे 15 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अखेर ते आम्हाला सोडून गेलेच...

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा