Join us  

मनोरंजनाच्या क्षेत्रात ‘सोनी मराठी’ ही दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 6:16 PM

सोनी मराठी ह्या नवीन वाहिनीच्या माध्यमातून सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये एक नवीन पायंडा घालू पाहत आहे.

सोनी मराठी ह्या नवीन वाहिनीच्या माध्यमातून सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये एक नवीन पायंडा घालू पाहत आहे. आजच्या काळाला अनुरूप असे विषय घेऊन येणारी ही नवीन वाहिनी येत्या १९ ऑगस्टला घराघरांत पोहोचणार असून मराठी भाषक श्रोत्यांसाठी सबंध कुटुंबानं एकत्रित पाहण्याजोग्या अशा कलाविष्कारांची एक पर्वणी असेल.

आशयघन मालिकांच्या माध्यमातून ‘विणूया अतूट नाती’ ह्या आपल्या मूळ विचाराशी एकनिष्ठराहत  सोनी  मराठीचा मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी अतूट नाती विणण्याचा प्रयत्न असेल. वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषयमांडणी असलेल्या ९ कथा मालिका (Fiction) आणि २ कथाबाह्य कार्यक्रम (Non-Fiction) सोनी मराठी सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांना सुपूर्द करेल. कथा मालिकांमध्ये ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘ह.म.बने तु.म.बने’, ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘ती फुलराणी’, ‘दुनियादारी फिल्मी इष्टाईल’, ‘इअर डाऊन’, ‘भेटी लागी जीवा’, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘गर्जा महाराष्ट्र’ह्यांचा समावेश आहे. ह्या मालिकांमध्ये नवीन आणि आजच्या काळाशी सुसंगत विषय हाताळलेले आहेत. तसेच ‘महाराष्ट्राचा फेव्हरट डान्सर’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हे कार्यक्रम प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन नक्कीच करतील. १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ५५व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार भव्य सोहळ्याच्या प्रक्षेपणाचे औचित्य साधून सोनी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मनोरंजनाच्या या रोजच्या खजिन्याबरोबरच ही वाहिनी मराठी रसिकांसाठी दर्जेदार मराठी चित्रपटांचा संच देखील घेऊन येणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजन