Join us  

छोट्या पडद्यावरील या मालिकेनं १०० भागांचा टप्पा पूर्ण, केलं जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 7:15 AM

'सिंधू' या मालिकेने १०० भागांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने सेटवर खास सेलेब्रेशन करण्यात आलं.

फक्त मराठी वाहिनीवरील 'सिंधू' या मालिकेने १०० भागांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने सेटवर खास सेलेब्रेशन करण्यात आलं.

सिंधू मालिकेनं नुकताच १०० भागांचा पल्ला गाठला. शतकपूर्तीचा सोहळा मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून साजरा केला. सोशल मीडियावरूनही सर्व कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानले आपापले अनुभव लिहत हा आनंद शेअर केला. संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याची भावना फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी व्यक्त केली.

'सिंधू...एका सामान्य मुलीची असामान्य कथा' ही एकोणिसाव्या शतकातील सिंधू या चिमुरड्या निरागस मुलीची उत्कट कथा आहे. बालकलाकार अदिती जलतारे सिंधूची भूमिका साकारत असून तिच्यासोबतच श्रीहरी अभ्यंकर, वेद आंब्रे, सौरभ सुतार, वंशिका इनामदार असे आणखीनही चिमुकले कलाकार आहेत. त्यासोबतच गौरी किरण, पूजा मिठबावकर, शाश्वती पिंपळीकर, प्रसाद दाबके, निकिता कुलकर्णी, नचिकेत जोग, मिलिंद पेमगिरीकर असे अनेक कलाकार या मालिकेतून महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत.

सिंधू मालिकेची संकल्पना श्रीरंग गोडबोले अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची असून त्यांच्याच इंडियन मॅजिक आय कंपनीतर्फे या कलाकृतीची निर्मिती होत आहे. विभावरी देशपांडे आणि श्रीरंग गोडबोले यांच्या या सुंदर कथेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वप्नील मुरकर सांभाळत आहेत.