Join us  

'अग्गंंबाई सासूबाई'मधील शुभ्रा आणि सोहम आले पुन्हा एकत्र, तेजश्री प्रधान-आशुतोष पत्कीचे फॅन्स झाले खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 5:24 PM

'अग्गंंबाई सासूबाई'नंतर आता तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की एका प्रोजेक्टसाठी पुन्हा एकत्र आले आहेत.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका अग्गंबाई सासूबाईने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील शुभ्रा, सोहम, आसावरी, अभिजीत राजे या सर्व पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि या मालिकेचे दुसरे पर्व दाखल झाले ते म्हणजे अग्गंबाई सूनबाई. या मालिकेला पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. मात्र दुसऱ्या पर्वात शुभ्रा आणि सोहमची भूमिका तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की साकारत नाहीत. मात्र आजही त्या दोघांच्या व्यक्तिरेखा चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. दरम्यान आता तेजश्री आणि आशुतोष पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत. 

अभिनेता आशुतोष पत्कीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, हा कलाकारांचा प्रामाणिकपणा आहे. सर्व क्रूचे समर्पण आणि निर्मात्यांचा विश्वासच प्रोजेक्ट बनवतो. त्या सर्वांनी मला पाठिंबा दिला. माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय पदार्पणावर त्यांनी विश्वास ठेवला. आम्ही सर्वांनी मिळून देशासाठी छोटासा प्रयत्न केला आहे. तुम्ही ते पाहिले का?  नाही तर लिंक खाली दिली आहे. तुमच्या अमूल्य अभिप्रायाची वाट पाहत आहे.

आशुतोषने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शॉर्टफिल्म बनवली आहे, ज्याचे नाव आहे संरक्षक देवदूत. या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन आशुतोषने केले आहे तर लेखन तेजश्री प्रधानने केले आहे. या लघुपटातून मुंबई पोलिसांना सलामी देण्यात आली आहे. 

आशुतोष पत्कीच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. या पोस्टवर तेजश्री प्रधाननेदेखील कमेंट केली आहे. तिने लिहिले की, मला तुझा अभिमान वाटतो. आशुतोष आणि तेजश्रीला एकत्र काम करताना पाहून त्यांचे चाहते खूश झाले आहेत. 

टॅग्स :तेजश्री प्रधान आशुतोष पत्की