Join us  

​सीआयडी टीममधील या सदस्याच्या निधनाने शिवाजी साटम यांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 6:04 AM

सीआयडी ही मालिका गेली १९ वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दया, अभिजीत, एसपी प्रद्युमन, फॅड्रीक्स या व्यक्तिरेखा ...

सीआयडी ही मालिका गेली १९ वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दया, अभिजीत, एसपी प्रद्युमन, फॅड्रीक्स या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत सुरुवातीपासूनच शिवाजी साटम, दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव काम करत असल्याने त्यांच्यासाठी सीआयडी या मालिकेची टीम ही एखाद्या कुटुंबासारखी बनली आहे. या मालिकेचे निर्माते बी. पी. सिंग आणि शिवाजी साटम हे तर अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. सीआयडी ही मालिका सुरू व्हायच्या आधीपासूनच या दोघांची खूप चांगली मैत्री आहे. हे दोघे एकमेकांच्या घरातील कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावतात. त्यामुळे या दोघांच्या परिवारातील सगळ्याच सदस्यांचे एकमेकांसोबतचे नाते खूपच चांगले आहे.बी. पी. सिंग यांचा मुलगा सलील सिंगचे काहीच दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. सलीलने सीआयडीच्या अनेक भागांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्याने सीआयडीचे काही भाग लिहिले देखील होते. त्यामुळे सीआयडीच्या टीमसोबत त्याची खूप चांगली गट्टी जमलेली होती. सलीलच्या निधनामुळे आम्हाला सगळ्यांना प्रचंड धक्का बसला आहे असे नुकतेच या मालिकेत एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारणारे शिवाजी साटम यांनी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सलीलच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर मला धक्काच बसला. सलीलसोबत काम करायला खूप मजा यायची. तो आपल्यापेक्षा सिनिअर असलेल्या लोकांशी नेहमीच अदबीने वागायचा. तो सीआयडीच्या सेटवर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा अॅक्शन बोलला, तेव्हापासूनच मी त्याला ओळखत आहे. त्याने बी. पी. सिंगने दिग्दर्शित केलेल्या एका कार्यक्रमात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. सलील आणि त्याची पत्नी माधवी हे मला माझ्या कुटुंबियातील सदस्याप्रमाणेच होते. सावधान इंडिया या कार्यक्रमाचे सलील दिग्दर्शन करत होता. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. कार्यक्रमाच्या टीमने सलीलला लगेचच मिरा रोड मधील ऑर्चिड रुग्णायलात नेले होते. पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. सलील हा बी.पी.सिंग यांचा मोठा मुलगा आहे. विशेष म्हणजे बी.पी. सिंग सावधान इंडियाच्या सेटपासून जवळच सीआयडीचे चित्रीकरण करत होते.  Also Read : सीआयडी या मालिकेतील दयाला एका दिवसाच्या चित्रीकरणासाठी मिळते इतकी मोठी रक्कम