Join us  

नकळत सारे घडले या मालिकेतील परीची १०० मुलांच्या ऑडिशनमधून झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 12:15 PM

स्टार प्रवाह या वाहिनीवर आजवर खूप चांगल्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत. देवयानी, पुढचं पाऊल यांसारख्या मालिकांना तर प्रेक्षकांनी ...

स्टार प्रवाह या वाहिनीवर आजवर खूप चांगल्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत. देवयानी, पुढचं पाऊल यांसारख्या मालिकांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आता नकळत सारे घडले ही मालिका या वाहिनीवर सुरू झाली असून या मालिकेला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. नकळत सारे घडले ही कथा आहे परीची. लडिवाळ आवाजात तिने विचारलेल्या मी तुला आई म्हणू...? या प्रश्नाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. स्टार प्रवाहच्या नकळत सारे घडले या मालिकेतील या छोट्या परीने खूपच कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात जागा पटकावली आहे. १०० हून अधिक मुलींच्या ऑडिशननंतर मालिकेच्या टीमला ही परी सापडली आहे.नकळत सारे घडले या मालिकेची मूळ संकल्पना आहे स्टार प्रवाह क्रिएटिव्ह टीमची आहे. तर अभिनेता स्वप्निल जोशीच्या जिसिम्स संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. बदलत्या काळातल्या बदलत्या नातेसंबंधाची गोष्ट या मालिकेत उलगडणार आहे. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अनुराधा राजाध्यक्ष, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची अशा उत्तम स्टारकास्टची निवड स्टार प्रवाहने या मालिकेसाठी केली आहे. मात्र, मालिकेचे प्रोमो सुरू झाल्यापासून छोटी परी चर्चेत आहे. परीच्या निवडीविषयी स्टार प्रवाहचे प्रवक्ते सांगतात, 'आम्हाला या भूमिकेसाठी अतिशय निरागस चेहऱ्याची मुलगी हवी होती. मात्र आताच्या काळात लहान मुले आपल्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर दिसतात आणि वागतात, जे आम्हाला नको होतं. महाराष्ट्रभरातून आलेल्या १०० हून अधिक छोट्या मुलींची आम्ही ऑडिशन्स घेतली. मात्र, आम्हाला कुणीच आवडत नव्हते. अचानक एका ऑडिशनमध्ये ही परी सापडली. ती ज्या आत्मविश्वासाने ऑडिशनला उभी राहिली, ते पाहूनच आम्ही तिला निवडले. ती खूप गोड आहे, निरागस आहे आणि महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांसारखीच आहे. ही परी प्रेक्षकांच्या मनात घर करणार, ही आमची खात्री आहे'.गाडी, बंगला, नोकर, सगळे काही या परीकडे आहे. पण आईची माया ती सगळ्यांमध्ये शोधते. या छोट्या, लाघवी परीचा प्रवास प्रेक्षकांना 'नकळत सारे घडले' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. Also Read : अभिनेता स्वप्निल जोशीची निर्मिती असलेली पहिली मालिका 'नकळत सारे घडले'