Join us  

​ये रिश्ता क्या कहलाता या मालिकेतील मोहसिन खान आणि शिवांगी जोशीने अखेर दिली प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2017 9:35 AM

मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे आपल्याला अनेकवेळा पाहायला मिळाले आहे. कुटुंब या मालिकेतील हितेन तेजवानी, गौरी ...

मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे आपल्याला अनेकवेळा पाहायला मिळाले आहे. कुटुंब या मालिकेतील हितेन तेजवानी, गौरी प्रधान तर दिल मिल गये या मालिकेतील जेनिफर विंगेट आणि करण सिंग ग्रोव्हर या अनेक कलाकारांनी मालिका संपल्यानंतर लग्न केल्याची उदाहरणे आपण ऐकली आहेत. या जोडप्यांमध्ये आणखी एका जोडीची भर पडणार आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत प्रेक्षकांना नायरा आणि कार्तिकचे लग्न पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या लग्नाचे चित्रीकरण खास बिकानेर येथे होणार आहे. या चित्रीकरणासाठी लवकरच या मालिकेची टीम बिकानेरला रवाना होणार आहे. एकमेकांच्या अथांग प्रेमात बुडलेले नायरा म्हणजेच शिवांगी जोशी  आणि कार्तिक म्हणजेच मोहसिन खान खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. या दोघांच्या अफेअरच्या अफवा कित्येक दिवसांपासून सुरू आहेत. पण त्यांनी याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. पण आता त्यांच्या नात्याची कबुली मोहसिनने दिली आहे. ते दोघे काही महिन्यांपासून नात्यात असल्याचे मोहसिनने म्हटले आहे. मोहसिन त्यांच्या नात्याबाबत सांगतो, "आमच्या दोघांची सुरुवातीपासून खूप चांगली मैत्री आहे. आमच्या दोघांच्या नात्याबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत आणि त्याचा आमच्या मैत्रीवर परिणाम होऊ नये म्हणून मी काहीही बोलणे आजवर टाळले होते. खरे तर सुरुवातीच्या काळात आमच्यात केवळ मैत्री होती. त्यामुळे मीडियात सुरू असलेल्या चर्चांबाबत काहीही बोलण्यात तथ्य नव्हते. पण गेल्या काही महिन्यात आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. आमच्या नात्याला केवळ दीड महिना झाला आहे. आम्ही दोघांनी नववर्षं माझ्या कुटुंबियांसोबत साजरे केले. आमच्यात अफेअर सुरू होऊन महिना उलटून गेला असला तरी अद्याप आम्ही दोघे डेटवर गेलेलो नाहीत. आमच्या मालिकेच्या व्यग्र चित्रीकरणामुळे आम्हाला कुठे फिरायला जाणे शक्य होत नाही. मला शिवांगीची निरागसता आवडत असल्याने मी बहुधा तिच्या प्रेमात पडलो असे मला वाटते. आम्ही सध्या एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत."