Join us  

सरकारवर का नाराज आहेत रामायणातील ‘राम’?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 2:00 PM

एकीकडे अरूण गोविल या प्रेक्षकांच्या प्रेमाने भारावले आहेत तर दुसरीकडे एक खंत त्यांना राहून राहून अस्वस्थ करतेय.

ठळक मुद्देरामाच्या भूमिकेइतकी लोकप्रियता त्यांना अन्य कुठल्याही भूमिकेने दिली नाही. विशेष म्हणजे, या मालिकेने त्यांचे करिअर संपुष्टात आले.

लॉकडाऊनच्या काळात दूरदर्शनवर अनेक जुन्या मालिका सुरु झाल्यात. रामायण, महाभारत या व अशा अनेक एकेकाळी गाजलेल्या मालिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या. विशेषत: रामायण या मालिकेने तर प्रेक्षकांना वेड लावले. इतके की, या मालिकेने टीआरपीचे सगळे विक्रम मोडीत काढले. साहजिकच रामायणमधील सगळे कलाकार सध्या चर्चेत आहेत. प्रभु रामचंद्राची भूमिका साकारणारे अभिनेते अरूण गोविल यांची तर सर्वाधिक चर्चा आहे. एकीकडे अरूण गोविल या प्रेक्षकांच्या प्रेमाने भारावले आहेत तर दुसरीकडे एक खंत त्यांना राहून राहून अस्वस्थ करतेय. होय, ट्विटरद्वारे त्यांनी ही खंत, नाराजी बोलून दाखवली आहे.

 नुकतीच अरूण गोविल यांनी ट्विटरद्वारे एका पोर्टलला मुलाखत दिली. अभिनय क्षेत्रात तुमचे मोलाचे योग्दान आहे. विशेषत: रामायणात़ पण तुम्हाला अद्याप कुठल्याही पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही, असे का? असा प्रश्न पोर्टलने अरूण गोविल यांना विचारला. त्यावर अरूण गोविल यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली.‘मला आजपर्यंत कोणत्याही सरकारकडून सन्मान मिळालेला नाही. मी मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. पण उत्तर प्रदेश सरकारने देखील मला आजपर्यंत सन्मान दिलेला नाही. पाच वर्षांपासून मी मुंबईत राहतोय. पण महाराष्ट्र सरकारने देखील मला कोणताही सन्मान   दिलेला नाही,’ असे अरूण गोविल यावर म्हणाले.

अरूण गोविल यांनी रामायण मालिकेत साकारलेल्या रामाच्या भूमिकेला अफाट लोकप्रिय मिळाली होती. या मालिकेनंतर त्यांनी अन्य काही मालिकेत काम केले. पण रामाच्या भूमिकेइतकी लोकप्रियता त्यांना अन्य कुठल्याही भूमिकेने दिली नाही. विशेष म्हणजे, या मालिकेने त्यांचे करिअर संपुष्टात आले. ‘रामायणानंतर मला चित्रपटाच्या आॅफर येणे बंद झाले. माझी राम ही भूमिका लोकांच्या मनात इतकी पक्की बसली होती की त्या पात्रामधून मला कधीच बाहेर पडला आले नाही. निर्माता-दिग्दर्शकही मला अन्य कुठल्या भूमिकेत पाहू इच्छित नव्हते. रामायणाने मला ओळख दिली. अपार लोकप्रियता दिली. पण याच मालिकेने माझे फिल्मी करिअरही संपवले,’ असे अरूण गोविल एका मुलाखतीत म्हणाले होते.

टॅग्स :रामायण