Join us  

कोरोनाकाळात राघ जुयालने केलेल्या कार्यासाठी 'डान्‍स दिवाने' टीमचा सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 6:00 AM

राघव जुयाच्या अनुपस्थितीत टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्‍हणून भूमिका बजावत होते.

कलर्सवरील 'डान्‍स दिवाने'चा सूत्रसंचालक राघव जुयाल मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा रसिकांचे भरघोस मनोरंजन करण्यासाठी परतला आहे. राघव जुयाच्या अनुपस्थितीत टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्‍हणून भूमिका बजावत होते. कार्यक्रमापासून दूर असताना राघव कोरोना काळात त्‍याची जन्‍मभूमी उत्तराखंडमध्ये मदतीसाठी मैदानात उतरला होता. तो कोविड रूग्‍णांसाठी ऑक्सिजन मिळण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यासोबत आवश्‍यक औषधे खरेदी करण्‍यामध्‍ये मदत करत होता.

कार्यक्रमात त्याची एंट्री देखील खास करण्यात आली. पालखीमधून त्याने मंचावर एंट्री केली. मोठ्या जल्लोषात राघवचे भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. सर्व स्‍पर्धकांनी त्‍याच्‍यासाठी 'घूमर' गाण्‍यावर नृत्‍य सादर केले. परीक्षक व स्‍पर्धकांनी राघवचे आभार मानले आणि लोकांना मदत करण्‍याच्‍या त्‍याच्‍या प्रयत्‍नांसाठी त्‍याला सलाम केला.

 

राघवचा मदतकार्याबाबतचा व्हिडिओ पाहून परीक्षक माधुरी दिक्षितनेही कौतुक करत म्हटले की, ''प्रत्‍येकजण विषाणूला घाबरून घरीच राहत असताना राघवने गावांमध्‍ये जाऊन गरजूंना मदत केली. तो न घाबरता लोकांना मदत करत होता आणि इतरांची काळजी घेत होता. तू केलेल्‍या या महान कार्यासाठी मी तुझे आभार मानते. मी तुला सलाम करते.''  

हे ऐकल्‍यानंतर राघव म्‍हणाला, ''मला साह्य करण्‍यासाठी सर्वांचे आभार. इतर कोणी असते तर मला परत येण्‍यास सांगितले असते, कारण मी या शोसोबत करार केला होता. पण, येथे मला सर्वांनी प्रोत्‍साहित केले आणि मी करत असलेल्‍या कार्याला पाठिंबा दिला. मी कलर्स आणि 'डान्‍स दिवाने'च्‍या टीमचे त्‍यांच्‍या निरंतर पाठिंब्‍यासाठी आभार मानतो. डान्‍सरच्या ग्रुप्सनेही जागरूकता पसरवण्‍यामध्‍ये आणि योग्‍य संपर्क मिळण्‍यामध्‍ये मदत केली. माधुरी दीक्षितनेही कॉलवरून मला सर्वतोपरी मदत केली.''

टॅग्स :माधुरी दिक्षित