Join us  

प्रायोगिक रंगभूमीची झोळी रिकामी का? नाट्य स्पर्धांपुरतीच उरली धुगधुगी

By संजय घावरे | Published: December 11, 2022 5:57 PM

 काही दिवसांपूर्वी मुंबईत मन खिन्न करणारा प्रकार घडला. 'मुंबई कोणाची?' या लोकनाट्याच्या मदतीसाठी ज्येष्ठ अभिनेते अंजन श्रीवास्तव यांना जेव्हा हाती झोळी घेऊन रसिकांकडे अक्षरश: मदतीची भीक मागितली...

 काही दिवसांपूर्वी मुंबईत मन खिन्न करणारा प्रकार घडला. 'मुंबई कोणाची?' या लोकनाट्याच्या मदतीसाठी ज्येष्ठ अभिनेते अंजन श्रीवास्तव यांना जेव्हा हाती झोळी घेऊन रसिकांकडे अक्षरश: मदतीची भीक मागितली, तेव्हा खऱ्या अर्थाने मुंबईतील प्रायोगिक नाट्यचळवळ थंडावल्याची जाणिव उपस्थितांना झाली. प्रायोगिक रंगभूमीवरील पूर्वीचे वैभव लोप पावले असून, प्रायोगिक नाटके केवळ नाट्यस्पर्धांपुरतीच उरली आहेत. 

प्रायोगिक रंगभूमी हा व्यावसायिक रंगभूमीचा पाया असल्याने इथे कलाकार घडले आहेत. प्रायोगिक रंगभूमीवर काही प्रयोगशील नाटकांनी इतिहास रचला आहे. यात दिलीप प्रभावळकर, सयाजी शिंदे, गौरी केंद्रे, वसंत सोमण अभिनीत 'एक झुंज वाऱ्याशी' या नाटकाच्या पावलावर पाऊल टाकत 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नंदू माधव दिग्दर्शित आणि कैलास वाघमारे अभिनीत नाटकाने प्रायोगिककडून व्यावसायिकच्या दिशेने झेपावत ८०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. एके काळी प्रायोगिक रंगभूमीचे माहेरघर मानले जाणारे दादरमधील छबिलदास हायस्कूल मागील काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रायोगिक नाटकांच्या प्रयोगांनी गजबजलेले असायचे. आज स्पर्धांसाठी केल्या जाणाऱ्या नाटकांची संख्या जास्त असली तरी प्रयोगांची संख्या रोडावली आहे. महिममधील महानगर पालिकेच्या शाळेतही प्रयोगिकचे प्रयोग व्हायचे, पण तिथे दररोज प्रयोग करणे शक्य नाही. स्टेशनपासून दूर आहे. पार्किंगची व्यवस्था नसून, तिथे पोहाचणे खर्चिक असल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. तरीही तिथे प्रयोग होण्यासाठी दिग्दर्शक रमेश मोरे यांनी प्रयत्न केले, पण त्यांना कोणाची साथ लाभली नाही. साठ्ये महाविद्यालयातील हॅाल परवडत नाही. कुर्ल्यातील प्रबोधन रंगमंचचे भाडे कमी असले तरी स्टेशनपासून दूर असून, आसनक्षमता कमी आहे. प्रायोगिक नाटकांना गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज असल्याची मागणी रंगकर्मींकडून होत आहे. तालीम आणि प्रयोग करण्यासाठी हक्काची जागा सरकारने द्यायला हवी. यासोबतच प्रायोगिक रंगभूमीवर काम करून पुढे नावारूपाला आलेल्या कलाकारांनीही या नाटकांना हात द्यायला हवा. आज प्रायोगिक नाटकांची मदार फक्त स्पर्धा आणि बक्षिसांवर आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाच प्रयोगांची अट असल्याने तेवढे तरी प्रयोग केले जात आहेत. अन्यथा नवीन प्रायोगिक नाटके फक्त स्पर्धेपुरती उरली असती...........................

- सिद्धार्थ जाधव (अभिनेता)तालमीपासून प्रयोगापर्यंत इथे सर्वच प्रयोगशील असल्याने या नाटकांना फायनान्सर मिळत नाही. ठरावीक रंगकर्मीच या नाटकांकरीता प्रयत्नशील असतात; पण इथून पुढे गेलेल्यांनीही मागे वळून पहायला हवे. राजकीय उदासीनता आहे; पण प्रायोगिक नाटकांसाठी थिएटर बनायला हवे. कला ही पोट भरल्यानंतर येत असल्याने नाटकांकडेही दुर्लक्ष होत आहे; पण कलाचा चांगला माणूस आणि समाज घडविण्याचे काम करत असते...............................

- रवी सावंत (सचिव, आविष्कार)जागेची सर्वात मोठी अडचण आहे. प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांची सीमारेषा धूसर झाली आहे. नवोदित कलाकार एखादे प्रायोगिक नाटक करतात आणि पुढे जातात. प्रायोगिक नाटकांसाठी थिएटर भाड्यात सवलत मिळत नाही. नाट्यगृहे बुक केल्यावरही ठरावीक वेळेअगोदर ओपन करून दिली जात नाहीत. यशवंत नाट्यगृह सुरू होण्याची प्रतीक्षा आहे...............................

दिग्गजांनी पुढाकार घ्यायला हवा...व्यावसायिक मराठी रंगभूमीवर समरसून काम करणाऱ्या आघाडीच्या कलाकारांनी वर्षाकाठी एक प्रायोगिक नाटक करण्यासाठी पुढाकार घेतला तर प्रायोगिक रंगभूमीला नवसंजीवनी मिळू शकेल. व्यावसायिक नाटकांच्या तोलामोलाचे दर्जेदार नाटक प्रायोगिक रंगभूमीवर उभे राहिल. .............................

खिशाला चाट देऊन केलेले नाटक...नेपथ्य न उभारता वातावरण निर्मिती केली जाते. एखादी चौकट किंवा ठोकळ्यांचा वापर होतो. बरेचसे कलाकार पैसे खिशातील पैसे खर्च करून आनंद मिळवण्यासाठी काम करतात. अभिनय कौशल्य दाखवण्याचे हे व्यासपीठ आहे. गीतकार-संगीतकारही मानधनाची अपेक्षा करत नाहीत. प्रकाश योजनाही अल्प दरात केली जाते. थिएटरचे भाडे, तिकिटे छपाई, पब्लिसिटी, सामानाची ने-आण करणे यासाठी प्रयोगागणिक कमीत कमी १० हजार रुपये खर्च येतो...............................

का पसरावी लागली झोळी?इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशनने (इप्टा) 'मुंबई कोणाची?'च्या रूपात प्रथमच मराठी नाटक रंगभूमीवर आणले. शिवदास घोडके दिग्दर्शित या नाटकात सुलभा आर्या यांच्यासह जवळपास ४० कलाकार आहेत. पुल देशपांडे कला अकादमीतील नाटकाचा प्रयोग संपल्यावर अंजन श्रीवास्तव यांनी इप्टाची व्यथा मांडताना पुन्हा हे नाटक करण्यासाठी इप्टाकडे पैसे नसल्याचे सांगितले. कोव्हिड काळात इप्टा डबघाईला आल्याने मी झोळी घेऊन बाहेर उभा राहातो, तुम्हाला यथाशक्ती जे देण्याची इच्छा होईल ते देण्याचे आवाहन त्यांनी रसिकांना केले.

टॅग्स :नाटक