Join us  

तब्बल नऊ वर्षांनंतर ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री करते टीव्ही मालिकेत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 12:04 PM

“काशिबाई बाजीराव बल्लाळ'' मालिकेत लहानपणीच्या काशीबाईंची भूमिका आरोही पटेलने, तर बाजीरावांची भूमिका वेंकटेश पांडे यांनी साकारली आहे.

लवकरच एक नवीन ऐतिहासिक मालिका रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. ही नवी मालिका मराठा साम्राज्यातील एका कुशल प्रशासक आणि मुत्सद्दी राजकारणी असलेल्या पण आजवर दुर्लक्षित राहिलेल्या ‘काशिबाई बाजीराव बल्लाळ’ यांच्या जीवनावर आधारित आहे.मालिकेत लहानपणीच्या काशीबाईंची भूमिका आरोही पटेलने, तर बाजीरावांची भूमिका वेंकटेश पांडे यांनी साकारली आहे. 

आता राधाबाईच्या व्यक्तिरेखेसाठी मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची निवड करण्यात आली आहे. 'घर की लक्ष्मी बेटीयाँ'  या सुपरहिट हिंदी मालिका आणि 'धडक'  या हिंदी चित्रपटातील भूमिकेबद्दल ऐश्वर्या प्रसिध्द आहेत. आता राधाबाईच्या भूमिकेद्वारे ऐश्वर्या नारकर तब्बल नऊ वर्षांनी आपल्या टीव्ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

 

 

यात ऐश्वर्या बाजीराव यांच्या आई राधाबाईंची भूमिका साकारणार आहेत. राधाबाई या शिस्तप्रिय, पण प्रेमळ आई तर होत्याच, पण त्या सर्वांची काळजी घेणाऱ्या कुटुंबप्रमुखही होत्या. आपल्या कुटुंबाचे भवितव्य काय असावे, याचा विचार करणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती होत्या. अशा या कणखर व्यक्तिरेखेला साकारताना पाहणे हा चांगला अनुभव असेल.

आपल्या व्यक्तिरेखेबद्दल ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “काशिबाई बाजीराव बल्लाळ'' मालिकेतील भूमिकेद्वारे बऱ्याच काळानंतर टीव्हीवर अभिनय करण्याचा अनुभव खूपच छान वाटत आहे. या मालिकेत राधाबाईंसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका साकारण्यास मी खूपच उत्सुक आहे. ती एक चांगलीच प्रभावशाली व्यक्तिरेखा आहे आणि मला सांगावंसं वाटतं की त्यांची शक्तिशाली आणि धाडसी वर्तणूक हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. 

मला मराठा सत्तेच्या गौरवशाली वारशानं नेहमीच भुरळ पाडली असून मला जेव्हा या मालिकेत एक भूमिका देऊ करण्यात आली, तेव्हा अशी भूमिका साकारण्याच्या कल्पनेने मी खूपच उत्साहित झाले. राधाबाईंभोवती असलेलं वलय आणि त्यांच्या कणखर नेतृत्त्वाच्या मी प्रेमात पडले आहे. मला अशाच व्यक्तिरेखा आवडतात. या महत्त्वपूर्ण मालिकेसाठी आम्ही खूप मेहनत घेतली असून प्रेक्षकांना ही मालिका पाहायला निश्चितच आवडेल, याची मला खात्री आहे. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकर