Join us  

निखिल राऊत सांगतो ही भूमिका साकारणे माझ्यासाठी होते आव्हानात्मक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 3:43 PM

गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमात काम करण्यास निखिल खूपच उत्सुक आहे. या कार्यक्रमाच्या केवळ काहीच भागांत त्याला प्रेक्षकांना पाहायला मिळणार असले तरी त्याच्यासाठी हा खूपच चांगला अनुभव असल्याचे तो सांगतो.

निखिल राऊत प्रेक्षकांना गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमासाठी तो सध्या चांगलीच तयारी करत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र जोशी करत असून या मालिकेत महाराष्ट्रातील विविध रत्नं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमात काम करण्यास निखिल खूपच उत्सुक आहे. या कार्यक्रमाच्या केवळ काहीच भागांत त्याला प्रेक्षकांना पाहायला मिळणार असले तरी त्याच्यासाठी हा खूपच चांगला अनुभव असल्याचे तो सांगतो.

निखिलने आजवर काहे दिया परदेस, तू तिथं मी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात त्याने किस्ना ही भूमिका साकारली होती. सध्या त्याचे चँलेज हे नाटक प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमात शिवाजी महाराज यांची भूमिका साकारण्याविषयी निखिल सांगतो, शिवाजी महाराजांवर माझी प्रचंड श्रद्धा आहे. फर्जंद या चित्रपटात मी शिवाजी महाराज यांच्या मावळ्याची म्हणजेच किस्नाची भूमिका साकारली होती. कोणत्याही कलाकारासाठी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे हे एक स्वप्न असते. आज गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमामुळे माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. मी माझ्या आजवरच्या कारकिर्दीत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. एक कलाकार म्हणून तुम्ही वैविध्यपूर्ण भूमिका साकारणे गरजेचे आहे असे मला वाटते. त्यामुळे प्रत्येक भूमिका मी चोखंदळपणे निवडतो. मी यापूर्वी शिवबा ते शिवराय या महानाट्यात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. पण छोट्या पडद्यावर मी पहिल्यांदा ही भूमिका साकारत आहे. शिवाजी महाराज यांची भूमिका छोट्या पडद्यावर साकारणे म्हणजे एक आव्हानच होते. पण हे आव्हान मी स्वीकारले. या कार्यक्रमातील माझा लूक हा खूपच चांगला दिसत असल्याचे सध्या माझे फॅन्स मला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.

गर्जा महाराष्ट्र या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन करत असून प्रतिमा जोशी या कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका आहेत तर लेखन समीर जोशी यांचे आहे.