झी मराठी वाहिनीवरील 'नवा गडी नवं राज्य' मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील राघव आणि आनंदीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. मालिकेत राघवची भूमिका अभिनेता कश्यप परुळेकरने साकारली आहे तर आनंदीची भूमिका पल्लवी पाटील हिने साकारली आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर कश्यपने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. त्याने इतक्या मोठ्या कालावधीनंतर मालिकेत काम करण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल मुलाखतीत सांगितले.
कश्यप परुळेकर याने २००९ साली मन उधाण वाऱ्याचे मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेतून त्याला घराघरात ओळख मिळाली. अभिनेत्याने अल्ट्रा झक्कासला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा छोट्या पडद्यावर का वळला याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, मन उधाण वाऱ्याचे मालिकेनंतर मी चित्रपटात काम करायचे ठरवले. त्या काळात बऱ्याच चित्रपटाच्या ऑफर्स आल्या. पण चुकीच्या लोकांच्या सानिध्यात गेल्यामुळे खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबरच जे काही चित्रपट मिळाले, त्यातले काही पूर्ण झाले नाही. तर काही चित्रपट पूर्ण होऊनही प्रदर्शित झाले नाहीत. त्यामुळे माझी प्रसिद्धी कमी झाली.
मालिका लगेचच प्रसिद्धी मिळवून देतात
कश्यप पुढे म्हणाला की, मला अनेकांनी हे करु नकोस असा सल्लाही दिला होता. मात्र मी ते ऐकले नाही. या दरम्यानच्या चार ते पाच वर्षांच्या काळात मी जवळपास २२ मालिका नाकारल्या. माझे काही चित्रपट लोकप्रिय झाले. पण आता आपण मालिकेकडे वळले पाहिजे, असे मला वाटू लागले. कारण मालिका या तुम्हाला लगेचच प्रसिद्धी मिळवून देतात. तुमची कला घराघरात पोहोचवण्याचे काम मालिका करत असतात. विशेष म्हणजे मालिकेत काम करत असताना तुम्हाला तुमच्या कामाची पोपावतीही लगेचच मिळते. त्यामुळेच मी पुन्हा एकदा मालिकेत वळलो.