Join us  

नकुल मेहताच्या मित्राला आला अमानवी शक्तीचा अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 12:19 PM

इश्कबाझमध्ये महत्त्वाची भूमिका रंगविणाऱ्या नकुल मेहताने आपल्या एका घनिष्ठ मित्राला आलेला असाच एक अमानवी शक्तीचा अनुभव नुकताच कथन केला.

स्टार प्लसवरील इश्कबाझमध्ये महत्त्वाची भूमिका रंगविणाऱ्या नकुल मेहताने आपल्या एका घनिष्ठ मित्राला आलेला असाच एक अमानवी शक्तीचा अनुभव नुकताच कथन केला.नकुल मेहताने सांगितले, “मी उदयपूरचा असून लोककथा आणि आख्यायिकांमधून या शहरातील लोकांना आलेल्या भूत-पिशाच्चांच्या अनुभवांविषयी बरंच ऐकलं होतं. शहराच्या विशिष्ट भागात अनेक लोकांना एकाच प्रकारच्या भुताखेताचं दर्शन झाल्याचं मी ऐकून होतो. असाच एक रस्ता आहे राणी रोड. दिवसा अतिशय नयनरम्य असलेला हा रस्ता रात्रीच्या वेळी मात्र धोकादायक मानला जातो. माझ्या एका मित्राला अलीकडेच या रस्त्यावर आलेल्या एका अनुभवामुळे मी मनातून काहीसा धास्तावलो. तो त्याच्या काही मित्रांबरोबर मध्यरात्रीच्या सुमारास राणी रोडवरून जात असताना त्यांना रस्त्याच्या मधोमध आपले लांब, न विंचरलेले केस मोकळे सोडून चाललेली एक स्त्री दिसली. मध्यरात्रीच्या वेळी एखादी स्त्री अशा प्रकारे रस्त्यावरून का चालत असावी, असे वाटून त्याने तिच्याजवळ आपली मोटार थांबविली. तो मोटारीतून उतरला आणि तिला विचारणारच होता, इतक्यात ती स्त्री अचानक त्याच्या नजरेसमोर अदृष्य झाली. ते पाहून हबकलेल्या माझ्या मित्राने मोटारीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण सुमारे तासभर त्याला त्या जागेवरून हलताच आलं नाही. नंतर तो गाडीत शिरला आणि मोटार सुरू व्हावी, अशी त्याने मनोमन प्रार्थना केली. पण अचूक एका तासानंतर त्याची मोटार आपोआप सुरू झाली, तेव्हा त्याने तिथून सूंबाल्या करीत आपलं घर गाठलं.

घरी आल्यावर त्याला जाणवलं की त्याचं अंग तापाने फणफणलं आहे. त्याने काही दिवस घरीच विश्रांती घेतली. अशा प्रकारच्या भुताखेतांवर माझा विश्वास नसला, तरी माझ्या मित्राच्या या अनुभवामुळे मला धक्का बसला आहे.” ‘स्टार प्लस’वर लवकरच ‘नजर’ ही आणखी एक अमानवी शक्तींवरील मालिका सुरू होणार असून आधुनिक भारतात घडणारी ही मालिका काहीशी फॅण्टसीसदृष्य आहे. आपल्याभोवती चेटकिणींची काळोखी शक्ती लपेटून असते आणि तिचा आपल्या जीवनावर प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम होत असतो, अशी या मालिकेच्या कथानकाची संकल्पना आहे.