Join us  

"ही स्पर्धा नसून संगीतमय आनंद देणारा सोहळाच...", मी होणार सुपरस्टार आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 5:35 PM

‘मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ या शोमध्ये सलील कुलकर्णी, बेला शेंडे, आदर्श शिंदे परिक्षणाची धुरा सांभाळणार असून अभिनेता पुष्कर श्रोत्री सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडणार आहे.

स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचा या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. छोट्या उस्तादांनी आपल्या सुरेल गाण्यांनी या पर्वाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. छोट्या उस्तादांच्या या धमाकेदार पर्वानंतर श्रीगणेशा होतोय नव्या पर्वाचा. ‘मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ या नव्या शोमध्ये छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजेच ४ ते ७० या वयोगटातील स्पर्धकांना आपलं टॅलेण्ट दाखवण्याची संधी मिळणार आहे. सलील कुलकर्णी, बेला शेंडे, आदर्श शिंदे परिक्षणाची धुरा सांभाळणार असून अभिनेता पुष्कर श्रोत्री सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवड चाचणी घेण्यात आली. या निवडचाचणीला भरघोस प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्राभरातून ७१ स्पर्धकांची निवड करण्यात आली. या ७१ जणांमधून २६ स्पर्धक मेगा ऑडिशनसाठी निवडण्यात आले आहेत.  १४ मे पासून रात्री ९ वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हे पर्व स्पर्धकांपेक्षा परिक्षकांसाठी अवघड जाणार आहे अशी भावना बेला शेंडे यांनी व्यक्त केली. ४ ते ७० हा वयोगट आहे त्यामुळे प्रेक्षकांना याचं नक्की आश्चर्य वाटेल की यातला बेस्ट स्पर्धक कसा निवडणार. मला वाटतं वयाचं बंधन कश्यालाचा नसतं. हवं असतं ते पॅशन. त्यामुळे गाणं मग ते कोणत्याही वयोगटातील स्पर्धकाने गायलं तरी ते तुम्हाला निखळ आनंद देतं. मी होणार सुपरस्टार आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम म्हणजे नुसती स्पर्धा नसून संगीतमय आनंद देणारा सोहळाच आहे असं मत बेला शेंडे यांनी व्यक्त केलं. 

‘स्टार प्रवाह वाहिनीचे आभार की त्यांनी अत्यंत आगळं वेगळं पर्व मला जज करण्याची संधी दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांना हा मंच स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देत आहे. गाण्याचे वेगवगळे प्रकार या मंचावर सादर होणार आहेत आणि हेच या कार्यक्रमाचं वेगळेपण आहे अशी भावना सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली.’  

टॅग्स :पुष्कर श्रोत्रीसलील कुलकर्णी