Join us  

#MeToo : बबिताजी अर्थात मुनमुन दत्ताने म्हटले, ‘ते अंकल मला एकांतात पकडायचे आणि...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 11:22 AM

मुनमुन दत्ताने केलेल्या या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुनमुन तिच्या लहानपणीच्या कटू आठवणी सांगताना अशा वृत्तीला धडा शिकवायलाच हवा असे म्हटले आहे. वाचा सविस्तर !

हॉलिवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिंच्या #MeToo या कॅम्पेनअंतर्गत जगभरातील महिला तथा सेलिब्रिटी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटना जाहीरपणे सांगत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन मल्लिका दुआ हिने तिच्याशी लहानपणी झालेल्या अशाच एका घटनेचा जाहीरपणे खुलासा केला होता. आता एका टीव्ही अभिनेत्रीने तिच्याशी झालेल्या शोषणाचा धक्कादायक खुलासा करून खळबळ उडवून दिली आहे. होय, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबिताजी अर्थात मुनमुन दत्ता हिने एक पोस्ट शेअर करीत अशा प्रकारचा खळबळजनक खुलासा केला आहे. पोस्ट शेअर करताना मुनमुन दत्ताने लिहिले की, ‘मी सुद्धा... होय मी सुद्धा... अशा प्रकारच्या समस्येवर पोस्ट शेअर करणे, लैंगिक शोषणाविरोधात जगभरात सुरू असलेल्या कॅम्पेनशी जोडले जाणे आणि या घटनेला बळी पडलेल्या महिलांविषयी सहानुभूती दाखविणे यावर ही बाब स्पष्ट होते की, ही किती मोठी समस्या आहे. मला आश्चर्य वाटत आहे की, काही चांगले पुरुष हे बघून चकित होत आहेत की, एवढ्या मोेठा प्रमाणात महिला अशा प्रकारच्या घटनांविषयी जाहीरपणे वाच्यता करीत आहेत. परंतु मला असे वाटते की, त्यांनी चकित होण्याचे काहीही कारण नाही. कारण हे सर्व तुमच्या घरातच घडत होते. तुमच्या मुली, आई, पत्नी यांच्यासह तुमच्या घरात काम करणाºया महिलांसोबत अशा प्रकारचे कृत्य घडत होते. त्यामुळे चकित होण्याऐवजी त्यांचे मन जिंकून त्यांना याबाबत विचारा. त्यांचे उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.’  मुनमुनने लिहिले की, हे लिहिताना माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत. कारण हे लिहिताना मी पुन्हा एकदा लहानपणीच्या त्या कटू आठवणी ताज्या करीत आहे. लहानपणी मी माझ्या शेजारी राहणाºया अंकलना घाबरत होते. कारण त्यांना जेव्हा-केव्हा संधी मिळायची तेव्हा ते मला पकडायचे आणि धमकी द्यायचे की, मी हे कोणाला सांगू नये. तसेच माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा असलेला माझा कझिन माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघायचा. माझे ट्यूशन घेणाºया शिक्षकाने तर माझ्या खाली हात लावला होता. परंतु अशातही मी काही म्हणू शकले नाही. कारण त्यावेळी मी एवढी लहान होते की, भीतीपोटी पोटात होणाºया वेदना सहन करायचे. खरं तर जेव्हा असे घडते तेव्हा तुम्हाला ही बाब समजत नाही की तुम्ही तुमच्या आई-वडिलांना ही गोष्टी कशी सांगायला हवी. तेव्हा तुमच्या मनात पुरुषांबद्दल एक वेगळीच घृणा निर्माण होते. मुनमुनने या कॅम्पेनमध्ये सहभागी झाल्याबद्दल लिहिले की, ‘मला स्वत:वर गर्व वाटत आहे. कारण मीदेखील या कॅम्पेनचा आवाज बनली आहे. त्याचबरोबर मी हादेखील एक संदेश देऊ इच्छिते की, आज जर माझ्याकडे कोणीही घाणेरड्या नजरेने बघितले तर त्याला धडा शिकविण्याची ताकद माझ्यात आहे.’