Join us

​केवळ सुनील ग्रोव्हरच नव्हे अली असगर आणि चंदन प्रभाकरदेखील सोडणार द कपिल शर्मा शो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 14:37 IST

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातील सगळी मंडळी काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्याच निमित्ताने सिडनीला गेली ...

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातील सगळी मंडळी काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्याच निमित्ताने सिडनीला गेली होती. तिथून परतत असताना विमानात कपिलने नशेच्या धुंदीत सुनील ग्रोव्हरसोबत भांडण केले. एवढेच नव्हे तर कपिलने त्याच्यावर हात उगारला आणि तू माझा नोकर आहेस असे तो सुनीलला बोलला. त्यावेळी या कार्यक्रमातील सर्व कलाकारांनी मध्यस्थी करून कपिलला शांत केले. कपिलचा हा अवतार पाहून विमानातील प्रवाशीदेखील घाबरले होते. या घटनेनंतर सुनील ग्रोव्हरने द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम सोडण्याचे ठरवले आहे आणि सुनीलने तसा खुलासादेखील लोकमतकडे केला आहे. पण आता त्याच्यासोबतच अली असगर, चंदन प्रभाकर हे दोघेही या कार्यक्रमाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचे नुकतेच चित्रीकरण झाले असून या चित्रीकरणाला सुनीलसोबतच अली आणि चंदन यांनी उपस्थिती लावली नाही. कपिलसोबत केवळ किकू शारदा, रोचेल राव आणि सुमोना चक्रवर्ती यांनी चित्रीकरण केले. सुनील, अली आणि चंदन हे तिघेही या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग असल्याने द कपिल शर्मा शोच्या टीमची चांगलीच पंचाईत झाली होती असे म्हटले जाते. ऐनवेळी राजू श्रीवास्तव, एहसान कुरेशी आणि सुनील पाल यांच्यासोबत या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले असे सांगण्यात येत आहे. सुनीलसोबतच अली आणि चंदन सेटवर न आल्याने त्यांनीदेखील कार्यक्रम सोडला असल्याचे म्हटले जात आहे.सुनील, अली आणि चंदन तिघेही या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याने त्याने कार्यक्रम सोडल्यास कपिल शर्माची चांगलीच पंचाईत होणार आहे.