Join us  

अमृता खानविलकर पहिल्यांदाच झळकणार मालिकेत, तर या कलाकारांच्या ही असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 8:00 AM

जिवलगा मालिकेत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयाने आणि ग्लॅमरने ही मालिका सजली आहे.

आघाडीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर हे दोघे अनुक्रमे सात आणि नऊ वर्षांनी छोट्या पडद्यावर झळकणार  आहेत. तर आपल्या ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर ही‘जिवलगा’मधून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. मधुरा देशपांडे सुद्धा या मालिकेतून वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येईल. स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयाने आणि ग्लॅमरने ही मालिका सजली आहे.

स्वप्नील जोशी आपल्या या पुनरागमनाबद्दल बोलताना म्हणाला, “मी ‘जिवलगा’मधील माझ्या भूमिकेबाबत खूपच उत्साही आहे. आज मी जो काही आहे तो टीव्हीमुळेच आहे. खूप वर्षांनंतर मी मालिका करतोय. मी आणि स्टार प्रवाहची संपूर्ण टीम ही मालिका आपल्यासमोर आणण्यासाठी उत्साही आहोत. यात विश्वास नावाच्या लेखकाची व्यक्तिरेखा मी साकारतोय. मागून काहीही मिळत नाही ते कमवायला लागतं यावर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे.

या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शित केली आहे.  ‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे. बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित होते. त्यामुळे ही कथा प्रत्येक घरातील प्रेक्षकाला आपलीशी वाटेल.

अमृता खानविलकर म्हणाली, ही मलिका कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. कोणतंही काम जेव्हा मी पहिल्यांदा करते तेव्हा मी खूप उत्साही असते. याआधी मी कधीच टीव्ही मालिका केलेल्या नाहीत. माझ्यासाठी सर्वात मह्त्वाचं असतं ते म्हणजे भूमिका. मग वेब सिरीज असोत, मराठी-हिंदी चित्रपट असोत किंवा रिऍलिटी शो. ‘जिवलगा’मधील भूमिका माझ्या आयुष्याचा एक भाग होणार आहे. मी साकारत असलेली काव्या ही आजच्या काळात जगणारी मुलगी आहे. तिच्या आयुष्यात तिला साजेसा असा एक विश्वास नावाचा जोडीदारही आहे. काव्याचं आपल्या पतीसोबत असणारं नातं हे सर्वसामान्य नवरा-बायकोच्या नात्यापेक्षा खूप वेगळं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, जितकी मजा मला ही भूमिका साकारताना येतेय तितकीच ती तुम्हाला बघताना येईल.” या मालिकेत अनेक आघाडीचे, गुणी आणि लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळे या मालिकेबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झालीय.

टॅग्स :अमृता खानविलकरस्वप्निल जोशीसिद्धार्थ चांदेकर