Join us  

ईशा केसकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 9:06 AM

Isha Keskar : जय मल्हार मालिकेद्वारे घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. या मालिकेत तिने बानू ही भूमिका साकारली होती. तिने या मालिकेतून अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती नव्या मालिकेतून भेटीला येत आहे.

झी मराठीवरच्या जय मल्हार मालिकेद्वारे घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर (Isha Keskar). या मालिकेत तिने बानू ही भूमिका साकारली होती. तिने या मालिकेतून अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. नुकतीच ती ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात दिसली होती. त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता ती बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. हो, हे खरंय. ती स्टार प्रवाहवरील नवीन मालिका लक्ष्मीच्या पाऊलांनीमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

ईशा केसकर लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. कला खरे असं तिच्या भूमिकेचं नाव असून ती एका वेगळ्या अंदाजात भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहसोबतची पहिली मालिका साकारण्यासाठी ईशा प्रचंड उत्सुक आहे. या मालिकेविषयी सांगताना ती म्हणाली, ‘सध्या सगळीकडेच नवरात्रौत्सवाची धामधूम सुरु आहे. अश्या या मंगलमय वातावरणात लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेचा प्रोमो येतोय ही खूप भारावून टाकणारी गोष्ट आहे. या मालिकेत मी कला खरे ही भूमिका साकारत आहे. नावाप्रमाणेच कला एक उत्तम कलाकार आहे. तिला हातकाम, रंगकला आणि चित्रकलेची आवड आहे. ती देवीची मूर्ती आणि दागिने घडवते. अंबाबाईच्या देवळाबाहेर कलाचं दागिन्यांचं दुकान आहे. ती स्वतःच्या हाताने सर्व पारंपारिक दागिने अगदी मनापासून बनवते. संपूर्ण कोल्हापूर शहरात तिने बनवलेले दागिने प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या कलाला गरीब-श्रीमंत असा भेद केलेला आवडत नाही. हे पात्र प्रत्येकाला आपलसं वाटेल असं आहे. 

ईशा पुढे म्हणाली की, आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे. हेच प्रेम कला आणि आमच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळतेय. किशोरी अंबिये माझ्या आईची भूमिका साकारत आहेत. किशोरी ताईंसोबत याआधीही काम केलं आहे. त्यामुळे सीन्स खूप छान होत आहेत. कोल्हापूरातल्या अनेक प्रसिद्ध ठिकाणी आम्ही सध्या शूट करत आहोत. मालिका सुरु होण्यापूर्वीच कोल्हापुरकरांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिका २० नोव्हेंबरपासून रात्री ९.३० वाजता आणि सुख म्हणजे नक्की काय असतं नव्या वेळेत रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.

टॅग्स :ईशा केसकर