Join us  

‘अमेरिका’ज गॉट टॅलेंट’साठी ‘डान्स+4’मधील ह्या स्पर्धकांना आले निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 6:53 PM

‘अमेरिका’ज गॉट टॅलेंट’मध्ये सहभागी होण्यासाठी ‘डान्स+4’मधील ‘व्ही-अनबीटेबल’ आणि ‘बी-युनिक’ या दोन स्पर्धकांना निमंत्रण देण्यात आले आहे.

नृत्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य कार्यक्रम असलेल्या ‘अमेरिका’ज गॉट टॅलेंट’मध्ये सहभागी होण्यासाठी ‘डान्स+4’मधील ‘व्ही-अनबीटेबल’ आणि ‘बी-युनिक’ या दोन स्पर्धकांना निमंत्रण देण्यात आले आहे. वैयक्तिक, दुहेरी आणि समूह नृत्यात आजवरच्या पारंपरिक नृत्यशैलीपेक्षा अगदी भिन्न प्रकारे नृत्याविष्कार सादर करून देशातील नृत्याच्या क्षेत्राचे स्वरूपच पालटवून टाकणाऱ्या ‘डान्स+4’ या कार्यक्रमासाठी ही गोष्ट निश्चितच गौरवास्पद आहे. ‘व्ही-अनबीटेबल’ या मुंबईतील 35 जणांच्या नृत्यगटाने ऑडिशन्सच्या फेरीपासूनच प्रेक्षक, परीक्षक आणि कार्यक्रमाचा सुपरजज्ज रेमो डिसुझा यांच्यावर आपल्या अफलातून नृत्यशैलीचा प्रभाव टाकला होता. जयपूरस्थित चार जणांचा गट असलेल्या ‘बी-युनिक’ या स्पर्धकांनीही आपल्या पॉपिंग आणि अ‍ॅनिमेशन शैलीच्या असामान्य नृत्य कौशल्याने सर्वांवर मोहिनी टाकली आहे. 

एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नृत्यविषयक कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाल्याने हे दोन्ही गट सध्या सातवे आसमानवर आहेत. या नव्या संधीमुळे आनंदित झालेल्या या गटांनी म्हटले, “आमचे नृत्य कौशल्य सादर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या या कार्यक्रमाकडून आम्हाला निमंत्रण देण्यात आले आहे, ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. ‘डान्स+4’ची ही आवृत्ती फारच आव्हानात्मक होती आणि तिने आता आपले मापदंड खूपच उंचावले आहेत. आमचे कौशल्य आणि त्यासाठी घेतलेल्या कठोर मेहनतीची दखल घेऊन तिची प्रशंसा करण्यात आल्याचे पाहून आम्हाला नक्कीच आनंद झाला आहे. आपली कला आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यासपिठावर सादर व्हावी, असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. आता आम्हाला ही संधी मिळाल्यामुळे आम्ही खरेच सुखावून गेलो आहोत. ‘डान्स+4’च्या स्पर्धेत आम्हाला मार्गदर्शन आणि प्रेरणा दिल्याबद्दल रेमोसरांचे आम्ही मनापासून आभार मानतो.”

टॅग्स :डान्स प्लस 4रेमो डिसुझा