Join us  

​तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील गोकुळधाम सोसायटीमध्ये होळीची धूम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2017 10:41 AM

गोकुळधाम सोसायटीत सगळेच सण उत्साहात साजरा केले जातात. रंगपंचमीचा उत्सवदेखील अतिशय जोशात दरवर्षी साजरा केला जातो. जेठालाल तर या ...

गोकुळधाम सोसायटीत सगळेच सण उत्साहात साजरा केले जातात. रंगपंचमीचा उत्सवदेखील अतिशय जोशात दरवर्षी साजरा केला जातो. जेठालाल तर या सणाची वर्षभर वाट पाहात असतो. कारण या सणाच्या निमित्ताने त्याला बबिलाला रंग लावण्याची संधी मिळते. पण दरवर्षी जेठालालची ही इच्छा पूर्ण होतच नाही. कारण जेठालालपासून बबिताला दूर ठेवण्यासाठी अय्यर प्रयत्न करतो आणि त्याच्या सगळ्या इच्छांवर पाणी फिरवतो. या वर्षीदेखील गोकुळधाम सोसायटीत हा रंगाचा खेळ सगळे मिळून साजरा करणार आहेत. रंग खेळण्याची सुरुवात यावेळी मिस्टर आणि मिसेस भिडे करणार आहेत. होलिकेचे दहन झाल्यानंतर सगळेच रंग खेळण्याच्या मुडमध्ये येणार आहेत. माधवी भिडे तर पिचकारी घेऊन आत्माराम भिडेला रंगाने, पाण्याने भिजवणार आहे. याविषयी माधवीची भूमिका साकारणारी सोनालिका जोशी सांगते, "मला स्वतःला रंग खूपच आवडतात. रंगपंचमी या सणात प्रत्येकजण आपले वय विसरून एखाद्या लहान मुलाप्रमाणे खेळतो, भरपूर मजा मस्ती करतो. त्यामुळे सगळ्या सणांमध्ये हा माझा आवडता सण आहे. मालिकेत यावर्षी मी आणि आत्मराम भिडे सगळ्यात पहिल्यांदा रंगपंचमी खेळायला सुरुवात करणार आहोत. आम्ही या भागाच्या चित्रीकरणाच्यावेळी खूप मजा मस्ती केली." या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वाकानीलादेखील हा सण खूप आवडतो. ती सांगते, "मी लहानपणापासूनच रंगपंचमी अतिशय आवडीने खेळते. मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळीदेखील मला रंगपंचमी खेळायला खूप आवडते. पण खऱ्या आयुष्यात मी आता रंगाने रंगपंचमी न खेळता केवळ कृष्णाला गुलाल लावून रंगपंचमी खेळते. या वर्षीदेखील आमची गोकुळधाममधील रंगपंचमी मजेदार असणार आहे."