Join us  

रंजक वळणावर ‘इश्क सुभान अल्ला’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी प्रसारित होतोय शेवटचा भाग

By सुवर्णा जैन | Published: October 01, 2020 12:50 PM

येत्या 2 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजता होणार मालिकेच्या अखेरच्या भागाचे प्रसारण

गेली अडीच वर्षे प्रसारित होत असलेली झी टीव्हीवरील ‘इश्क सुभान अल्ला’ ही तरूण प्रेमकथा दोन आवृत्त्यांच्या यशस्वी प्रसारणानंतर येत्या 2 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ज्या काळात ही मालिका प्रसारित होत होती, सुरूवातीपासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला उदंड प्रतिसाद दिला. अदनान खान, तुनिषा शर्मा आणि आएशा सिंह या गुणी कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाने या मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा सुस्पष्टपणे उभ्या राहिल्या आणि या मालिकेचे कथानक अधिकच उत्कंठावर्धक होत राहिले. ही मालिका सध्या तिच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच प्रेक्षकांचा निरोप घेत असून त्यातील कबीर आणि झारा या प्रमुख व्यक्तिरेखा निकाहद्वारे पुन्हा एकत्र येताना दिसतील.

मालिकेत झारा या नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री आएशा सिंहने आपल्या व्यक्तिरेखेला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, “आमच्यावर प्रेमाचा प्रचंड वर्षाव केल्याबद्दल मी आमच्या सर्व प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभार मानते. या मालिकेसाठी काम करतानाचा प्रत्येक क्षण मी आनंदात अनुभवला असून येत्या काही दिवसांमध्ये मला तिच्या चित्रीकरणाची आठवण नक्कीच येत राहील. ही मालिका म्हणजे माझ्यासाठी माझं बाळच होतं. या मालिकेदरम्यान मी ज्यांच्याशी मैत्री केली ते सर्वजण आणि माझ्या सहकलाकारांची मला सारखी आठवण येत राहील. झाराच्या भूमिकेने मला एक वेगळीच ओळख प्राप्त करून दिली असून या भूमिकेचं स्थान माझ्या मनात खास स्थान राहील. या भूमिकेकडून मला बरंच काही शिकायला मिळालं आणि ही भूमिका इतकी प्रेरणादायक होती की मला त्यातून मनाने बाहेर पडून पुन्हा आएशा म्हणून जगता येण्यास काही काळ निश्चितच जाईल. एखाद्या कलाकारासाठी यापेक्षा मोठी कामगिरी दुसरी नसेल, असं मला वाटतं.”

कबीर या भूमिकेला मिळालेल्या अपूर्व प्रतिसादाबद्दल अदनान खान म्हणाला, “ गेली अडीच वर्षं मी कबीर म्हणूनच जगत होतो आणि या भूमिकेने माझ्या जीवनावरही सखोल परिणाम घडविला आहे. या मालिकेसाठी चित्रीकरण करतानाचा अनुभव अद्वितीय होता आणि हा प्रवास अतिशय आनंददायक केल्याबद्दल मी माझी सहकलाकार आएशा सिंह, मोनिका खन्ना आणि सर्व कर्मचा-यांचा खूप आभारी आहे. या मालिकेत काम करतानाचा काळ माझ्या सदैव स्मरणात राहील. आता ही मालिका संपुष्टात येत असताना मी इतकंच म्हणीन की ज्याचा शेवट गोड, ते सारंच गोड! या मालिकेशी संबंधित सर्व लोकांचे मी आभार मानतो, विशेषत: आमच्यामागे भक्कम आधार म्हणून उभे राहिलेल्या आमच्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानतो.