Join us  

Gautami Kapoor Birthday Special: वाचा दीर-भावजयीची जोडी कशी अडकली विवाहबंधनात?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 6:30 AM

राम आणि गौतमी यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.

ठळक मुद्देकाहीच काळात राम आणि गौतमी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि एका पार्टीत रामने गौतमीला लग्नाची मागणी घातली आणि त्यांनी २००३ च्या व्हेलेंटाईन डे ला लग्न केले. सुरुवातीला दोघांच्या घरातून या लग्नाला विरोध होता. पण काहीच काळात तो निवळला. 

गौतमी कपूरचा आज म्हणजेच २१ जूनला वाढदिवस असून तिने एक मॉडेल म्हणून तिच्या करियरला सुरुवात केली. बिनधास्त या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली होती. तिने त्याचप्रमाणे कहता है दिल, घर एक मंदिर, क्योंकी साँस भी कभी बहू थी, परवरिश २ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच स्टुंडट ऑफ द इयर, फना, शादी के साईड इफेक्ट यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील ती झळकली आहे. 

गौतमी ही प्रसिद्ध अभिनेता राम कपूरची पत्नी असून रामच्या आधी तिने फोटोग्राफर मधुर श्रॉफ सोबत लग्न केले होते. पण काहीच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेतला. राम आणि गौतमी यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. त्या दोघांची प्रेमकथा ही एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. घर एक मंदिर ही मालिका अनेक वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती. या मालिकेत रामच्या वहिनीची भूमिका गौतमीने साकारली होती. या मालिकेदरम्यानच राम आणि गौतमी एकमेकांच्या प्रेमात पडले. 

राम कपूर आणि गौतमी गाडगीळ यांची भेट ‘घर एक मंदिर’ या मालिकेच्या सेटवर सगळ्यात पहिल्यांदा झाली. या मालिकेत अभिनेता अमन वर्मा गौतमीचा नायक होता तर राम तिच्या दीराच्या भूमिकेत होता. या मालिकेच्या काहीच भागांनंतर गौतमीचा पती म्हणजेच अमनचे निधन होते आणि राम कपूर नकळतपणे आपल्या वहिनीच्या प्रेमात पडतो आणि मालिकेच्या शेवटी त्या दोघांचे लग्न होते असे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते.

घर एक मंदिर या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान राम आणि गौतमी खूप चांगले फ्रेंड्स बनले. त्या दोघांची मैत्री इतकी घनिष्ठ होती की, रामला कोणती मुलगी आवडली तर तो सगळ्यात पहिल्यांदा गौतमीलाच येऊन सांगत असे आणि त्यावर तिचा सल्ला देखील मागत असे. राम आणि गौतमी दोघे फ्रेंड्स असले तरी ते दोघे एकमेकांपेक्षा खूपच वेगळे होते. गौतमी ही घर आणि काम या गोष्टींना प्राधान्य देणारी होती तर रामला पार्ट्यांमध्ये मजा मस्ती करायला आवडत असे. त्याची प्लेबॉय अशी इमेज होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. पण काहीच काळात त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि एका पार्टीत रामने गौतमीला लग्नाची मागणी घातली आणि त्यांनी २००३ च्या व्हेलेंटाईन डे ला लग्न केले. सुरुवातीला दोघांच्या घरातून या लग्नाला विरोध होता. पण काहीच काळात तो निवळला. 

छोट्या पडद्यावरील क्यूट कपलमध्ये आता राम आणि गौतमी यांची गणना होते. त्या दोघांना दोन मुले असून मुलांच्या जन्मानंतर गौतमीने अभिनयक्षेत्रात काम करणे खूपच कमी केले आहे. 

टॅग्स :राम कपूर