Join us  

'ध्रुव तारा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, सुशीलाने ध्रुव आणि ताराला काढलं घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 5:47 PM

Dhruva Tara : 'ध्रुव तारा - समय सदी से परे’ या मालिकेत दोन वेगवेगळ्या कालखंडातून येणाऱ्या ध्रुव (इशान धवन) आणि ताराप्रिया (रिया शर्मा) या जोडीची अद्वितीय प्रेमकथा साकारण्यात आली आहे.

सोनी सबवरील 'ध्रुव तारा - समय सदी से परे’ या मालिकेत दोन वेगवेगळ्या कालखंडातून येणाऱ्या ध्रुव (इशान धवन) आणि ताराप्रिया (रिया शर्मा) या जोडीची अद्वितीय प्रेमकथा साकारण्यात आली आहे. काळाचे नियम मोडीत काढत 17 व्या शतकातील राजकन्या तारा ही तिच्या वल्लभगड राज्यातून नवरंगवन या टाइम पोर्टलच्या माध्यमातून थेट सन 2023 या वर्षात पोहोचते. वल्लभगड राज्याचे भविष्य असलेल्या तिच्या भावाची प्रकृती अत्यंत गंभीर असते. यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्याच्या आजारावरील उपाय शोधण्यासाठी ताराने हे पाऊल उचललेले आहे. सन 2023 मध्ये ती अत्यंत कुशल न्यूरोसर्जन ध्रुव याला भेटते, जो तिच्या भावाला वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. या अनोख्या मालिकेने बांधून ठेवणारे कथानक, अत्यंत कर्णमधुर पार्श्वसंगीत अन् ध्रुव आणि तारा यांच्यातील प्रेमाच्या लोभस क्षणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही प्रेक्षकांसाठी ताज्या हवेची झुळूक ठरली आहे. 

मालिकेतील आगामी भागांत ध्रुव आणि तारा हे एकमेकांशी विवाहबद्ध होणार असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तथापि, एका असामान्य घटनाक्रमात ध्रुव आणि तारा हे अत्यंत चतुरपणे विवाह सोहळ्याला चकवून पळून जाण्यात यशस्वी ठरतात. मात्र, त्यांची नियती वेगळाच खेळ खेळत असते. ध्रुवची आई सुशीला (नीलिमा सिंह) यांच्याकडून ते पकडले जातात. 

ध्रुव आणि तारा यांना त्यांच्या लग्नाच्या वेशभूषेत पाहून सुशीला या जागच्या जागी थिजून जातात. त्या अत्यंत संतप्त होतात. आपला मुलगा ध्रुवने आपल्या आज्ञेचे उल्लंघन करून ताराशी लग्न केल्याची गोष्ट काही केल्या त्यांच्या पचनी पडत नाही. ध्रुव आणि तारा हे आता यापुढे आपल्यासोबत राहू शकत नाही, अशी घोषणा सुशीला संपूर्ण कुटुंबासमोर करतात अन् त्या दोघांची घरातून हकालपट्टी केली जाते. सुशीला यांना ध्रुव आणि तारा यांच्या विवाहामागचे सत्य कळेल का? किंवा या नव्या समस्येमुळे तारा ही आपल्या मूळ योजनेच्या उद्देशापासून भरकटेल का? हे आगामी भागात कळेल.