Join us  

‘उतरन’ फेम टीना दत्ताबरोबर फ्लाइटमध्ये छेडछाड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2016 5:07 PM

छोट्या पडद्यावरील ‘उतरन’ मालिका फेम अभिनेत्री टीना दत्ता हिच्यासोबत फ्लाइटमध्ये छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टीनाने तिच्या ...

छोट्या पडद्यावरील ‘उतरन’ मालिका फेम अभिनेत्री टीना दत्ता हिच्यासोबत फ्लाइटमध्ये छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टीनाने तिच्या फेसबुक पेजवर या संपूर्ण घटनेची माहिती शेअर केली असून, फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या स्टाफने संबंधितांवर कुठलीही अ‍ॅक्शन घेतली नसल्याचा आरोपही तिने केला आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा ती मुंबई विमानतळावर फ्लाइटमध्ये बसलेली होती. टीनाने फेसबुक पेजवर दिलेल्या माहितीनुसार ती मुंबईहून राजकोटला जाणाºया फ्लाइटमधून प्रवास करीत होती. ती तिच्या मॅनेजरसोबत ३० नंबरच्या सीटवर बसलेली होती. तेव्हा तिला जाणवले की, कोणीतरी तिला पाठीमागून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करीत आहे. जेव्हा तिने मागे वळून बघितले तर मागच्या सीटवर ४५ वर्षापेक्षा अधिक वयाची व्यक्ती बसलेली होती. टीनाने त्याला तिथेच खडेबोल सुनावत फ्लाइटमधील स्टाफकडे त्याची तक्रार केली.  जेव्हा टीनाने त्या व्यक्तीला सुनावले तेव्हा तो तिची माफी मागत होता; मात्र त्याने केलेले वर्तन हे माफी योग्य नसल्याने टीनाने फ्लाइटमधील स्टाफ, एअर होस्टेस यांच्याकडे त्याची तक्रार केली; मात्र स्टाफने संबंधित व्यक्तीवर कारवाई न करता त्याला सीट बदलायला सांगितले. ">टीनाने या निर्लज्ज विचाराच्या व्यक्तीला फ्लाइटमधून डिपोर्ट करण्याची मागणी केली होती. परंतु स्टाफने केवळ त्याला सीट बदलायला सांगितल्याने ती आश्चर्यचकित झाली; मात्र घडलेला प्रकार हा अतिशय घृणास्पद असल्याने टीनाने फ्लाइटच्या कॅप्टनशी बोलण्याची मागणी केली. मोठ्या मुश्कीलीनंतर तिला ही संधी मिळाली. कॅप्टननेदेखील त्या व्यक्तीवर कारवाई न करता जोपर्यंत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली जात नाही, तोपर्यंत आम्ही त्याला डिपोर्ट करू शकत नाही, असे सांगितले. फ्लाइटमधील स्टाफच्या या भूमिकेमुळे टीना चांगलीच संतापली होती. विशेष म्हणजे फ्लाइटमधील एक परिवार सोडला तर तिच्या बाजूने इतर प्रवाशांनी बोलण्याचे धाडस केले नाही. उलट सर्व प्रवासी घडलेल्या प्रकाराची गंमत बघत होते, असेही टीनाने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच जेट एयरलाइन्सच्या नियमांविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अशा प्रकारच्या परिस्थितीत संबंधित प्रवाशावर कारवाई करण्यासाठी तुमच्याकडे कुठलेच नियम नाहीत का? असा सवालही विचारला आहे.