Join us  

​कुटुंबाच्या सहकार्याने यशस्वी होणे शक्य- देशना दुगाड !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 12:50 PM

-रवींद्र मोरे आजपर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये तसेच काही चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांचे मन जिंकणारी बाल कलाकार देशना दुगाड ...

-रवींद्र मोरे आजपर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये तसेच काही चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांचे मन जिंकणारी बाल कलाकार देशना दुगाड अगदी कमी वेळेत प्रकाशझोतात आली. तिचा अभिनय खूपच कौतुकास्पद असून ती लवकरच एका शोमध्ये दिसणार आहे. एकंदरीत तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत सीएनएक्सने मारलेल्या मनसोक्त गप्पा...* अभिनय क्षेत्रात करिअर करावेसे का वाटले?  - मी शाळेत अभ्यासक्रमाबरोबरच विविध अ‍ॅक्टिव्हिटीजमध्येही नेहमी तत्पर राहायची. शिवाय शाळेच्या वार्षिक स्रेहसंमेलनात ड्रामा आणि डान्स स्पर्धेत आवर्जून सहभाग घ्यायची. जेव्हा मी एका मालिकेत काम केले तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला आणि या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले.  * २०१५ मध्ये तुला ‘चार्मिंग गर्ल’चा अवॉर्ड मिळाला, तर त्यावेळी काय वाटले होते?  - हो, मला इंदोर मध्ये हा अवॉर्ड मिळाला होता. मी इंदोरचीच आहे. यावेळी मला खूपच आनंद झाला होता. शिवाय माझ्या कुटुंबाबरोबरच सर्वांनाही खूपच आनंद झाला होता. त्यावेळी माझ्या कष्टाचे सर्वांनी कौतुक तर केलेच शिवाय मी एक चांगली अभिनेत्री बनण्यासाठीही आशिर्वाद दिला.  * तु अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तॉँ‘’ मध्ये दिसणार आहेस, त्यांच्यासोबत अ‍ॅक्टिंगचा अनुभव कसा होता? - हो, मी त्यांच्यासोबत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तॉँ’ मध्ये दिसणार आहे. हा माझ्यासाठी खूपच मोठा अनुभव होता. एकदा मी अमिताभजींच्या पाया पडायला गेले तर त्यांनी मला म्हटले की, ‘बेटीयॉँ पैर नही छुती...! ’ असे बोलून त्यांनी मला भावी वाटचालीसाठी आशिर्वाद देऊन प्रार्थनाही केली.  * तुझ्या आगामी शो बद्दल काय सांगशिल?- या शोमध्ये मी आठ वर्षीय मरियमची भूमिका साकारत आहे. यात मी भोपाळमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत असून मला मित्रांसोबत खेळणारी, मौजमजा करणारी दाखविण्यात येणार आहे. शिवाय यात मला माझ्या वडिलांची लाडली दाखविण्यात आली आहे, जे नेहमी माझ्या आईच्या रागावण्यापासून माझा बचाव करतात. यात माझे वडील एक पत्रकार असून ते नेहमी मला चांगल्या आणि वाईट गोष्टींबाबत ज्ञान देत असतात.  * अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तुझ्या कुटुंबाचे सहकार्याबाबत काय सांगशिल?  - माझे कुटुंब खूपच आनंदी असून तेवढेच सहायकदेखील आहे. मी सध्या मुंबईत आजी, आजोबांसोबत राहत असून ते माझ्या कामाची प्रशंसा नेहमी त्यांच्या मित्रांजवळ आणि त्यांच्या कुटुंबीयांजवळ करत असतात. शिवाय मला चांगले काम करण्यासाठी आशिर्वादही देतात. या शोमधील मरियमच्या भूमिकेसाठी  मी खूपच उत्सुक असून यासाठी मला माझ्या कुटुंबांचे पूर्णत: सहकार्य लाभत आहे.