Join us  

​घाडगे & सून मालिकेचे १०० भाग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 11:49 AM

घाडगे & सून ही मालिका सुरू झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. यामधील सर्वच कलाकारांनी ...

घाडगे & सून ही मालिका सुरू झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. यामधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या कुटुंबावर निस्वार्थीपणाने प्रेम करणाऱ्या माईंना म्हणजेच सुकन्या कुलकर्णी यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. तसेच चिन्मय उद्गीरकर याचा सहज अभिनय, अतिशा नाईक यांचे खोचक बोलणे प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. भाग्यश्री लिमयेची ही पहिलीच मालिका असली तरी तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. १०० भाग पूर्ण झाल्याचा आनंद या मालिकेच्या संपूर्ण टीमने मिळून साजरा केला. यावेळी मालिकेच्या लेखिका अश्विनी शेंडे आणि अरुणा जोगळेकर, दिग्दर्शक तसेच निर्माते जितेंद्र गुप्ता आणि महेश तागडे, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, अतिशा नाईक, मंजुषा गोडसे, भाग्यश्री लिमये, स्वाती लिमये, अभिनेते उदय सबनीस, चिन्मय उद्गीरकर, संदीप गायकवाड उपस्थित होते. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी १०० भाग पूर्ण झाल्याबद्दल मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन केले. मालिकेचा नायक चिन्मय उद्गीरकरने सेटवर स्पेशल केक आणला होता. हा केक मालिकेच्या सगळ्या टेक्निकल टीमच्या हस्ते कापण्यात आला. यावेळी मालिकेचे शीर्षक गीत सगळ्यांनी मिळून म्हटले. याविषयी बोलताना चिन्मयने सांगितले, घाडगे & सून मालिकेचे गेल्या दोन आठवड्यामध्ये सलग एका तासाचे भाग प्रक्षेपित झाले. ज्यामध्ये आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली. स्पॉट दादा, टेक्निकल टीम, आमचे दिग्दर्शक, सगळे कलाकार या सगळ्यांनी मिळून हे शिवधनुष्य पेलले. आम्ही कलाकार प्रेक्षकांना रोज भेटतो पण हे पडद्यामागचे जे खरे कलाकार आहेत, जे दिवस रात्र मेहनत घेतात त्यांचे कौतुक, सत्कार हा झालाच पाहिजे असे मला वाटले. त्यामुळेच आम्ही केक टेक्निकल टीमच्या हस्ते कापण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमच्या मालिकेच्या सेटवर नेहमीच कोणते ना कोणते तरी सेलिब्रेशन करतच असतो. मालिकेला १०० भाग पूर्ण झाल्यामुळे आम्हाला सेलिब्रेशन करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली.  Also Read : घाडगे & सून मालिकेतील चिन्मय उद्गिरकर, सुकन्या कुलकर्णी आणि भाग्यश्री लिमयेचा फोटो सोशल मीडियावर हिट