Join us  

'तुझ्यात जीव रंगला'मधील या अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 1:31 PM

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादाचे वडील म्हणजेच आबांची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद दास्ताने यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादाचे वडील म्हणजेच आबांची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद दास्ताने यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. औंध येथील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स मधून मिलिंद यांनी २५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे घेऊन पैसे न दिल्याचा प्रकार समोर आलाय.  या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे मिररच्या रिपोर्टनुसार औंधमधील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले निलेश दास्ताने यांनी ४ मार्च २०१८ अक्षय गाडगीळ यांना फोन करुन आपल्या ओळखीतील मिलिंद दास्ताने हे दुकानात खरेदीसाठी आल्याचे सांगितले. ते फोनवर म्हणाले की, मिलिंद यांनी ४ लाख ९२ हजार रुपयांचे सोने खरेदी केले आणि २.४४ लाखांचे दोन चेक दिले. पण ज्यावेळी मी सांगेन त्याचवेळी चेक बँकेत जमा करण्याचे मिलिंद यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे बरेच दिवस मिलिंद यांनी दिलेले चेक बँकेत जमा करण्यात आले नाहीत. त्यानंतर पुन्हा एकदा ११ मार्च रोजी मिलिंद दुकानात खरेदीसाठी आले. त्यावेळी पूर्वी दिलेले चेक माघारी घेऊन दुसऱ्या बँकेचे चेक दिले. दोन्ही चेकपैकी एक चेक वटलाच नाही. त्यानंतर अक्षय गाडगीळ यांनी ‘मिलिंद दास्ताने यांना मी ओळखत नसून ते कोण आहेत?’, असा प्रश्न व्यवस्थापक निलेश याला विचारला. त्यावर मिलिंद दास्ताने हे मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेता असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे निलेश आणि मिलिंद यांची पूर्वीपासूनची ओळख असल्याचे गाडगीळ यांना समजले.

दरम्यान, मिलिंद हे लवकरच सगळे पैसे व्याजासकट परत करणार असल्याचे निलेशने गाडगीळ यांना सांगितले. त्यानंतर मिलिंद यांनी निलेशला आपल्या आईची डोंबिवली येथे जागा असून, व्यवहार चालू आहे. हा व्यवहार झाल्यानंतर ३ कोटी ५२ लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे जेवढे सोने खरेदी करू, तेवढी रक्कम एकत्रित देऊ असेही सांगितले होते. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नी पुन्हा दुकानात आले. त्यांनी सोन्याचे दागिने, बिस्किटे, हिऱ्याची अंगठी, चांदीचे दागिने असे एकूण २५ लाख ६९ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. मात्र वर्षभरानंतरही त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यानंतर पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या मालकांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

मिलिंद दास्ताने यांच्याकडे पैसे नसतील तर त्यांनी खरेदी केलेले सोने परत करावे अशी मागणी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या मालकांनी केली आहे. पोलीस मिलिंद दास्ताने यांच्या पुण्यातील घरी पोहचले होते मात्र त्यांच्या घराता टाळं होतं. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाझी मराठी