Join us

​‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’द्वारे चित्रांगदा सिंह करणार टेलिव्हीजनवर पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 11:18 IST

डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स या कार्यक्रमाने तुफान लोकप्रियता मिळविली असून या कार्यक्रमामुळेच फैझल खान, हरप्रीत, जीतूमणी, तेरिया मगर ...

डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स या कार्यक्रमाने तुफान लोकप्रियता मिळविली असून या कार्यक्रमामुळेच फैझल खान, हरप्रीत, जीतूमणी, तेरिया मगर आणि राजस्मिता कार हे कलाकार आज प्रसिद्ध नर्तक म्हणून ओळखले जातात. यापैकी प्रत्येक कलाकाराने नृत्याच्या क्षेत्रात स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली असून मनोरंजनाच्या क्षेत्रात ते नामवंत झाले आहेत. आता ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमाच्या चौथ्या सिझनमध्ये हे सर्व कलाकार पुन्हा एकदा सहभागी होताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेचा दर्जा अधिक उंचावला जाणार आहे. या चौथ्या सिझन मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत अभिनेत्री चित्रांगदा सिंह प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ती या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने या चित्रपटातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्या असून आओ राजा आणि काफिराना यांसारख्या काही तुफान गीतांवरही ती थिरकली आहे. आपले सौंदर्य, संवेदनशील अभिनयकला आणि नृत्यकौशल्याने तिने रसिक प्रेक्षकांवर आपली मोहिनी घातली आहे. आता ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ स्पर्धेतील परीक्षकाच्या भूमिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. याविषयी चित्रांगदा सांगते, “एक अभिनेत्री म्हणून माझ्या कारकीर्दीत नृत्यकलेला विशेष महत्त्व आहे. नृत्यकलेला मी कथा सांगण्याचं आणि भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम समजते. आपल्या चित्रपटांमध्ये नृत्याला अचूक स्थान देणारी आपली संस्कृती बहुदा एकमेव असून त्यामुळे चित्रपटाची कथा पुढे जात राहते. एखाद्या टीव्ही कार्यक्रमात सहभागी होण्याची माझी ही पहिलीच वेळ असून ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ स्पर्धेत सहभागी होत असल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. टीव्ही हे माध्यम इतकं व्यापक आहे की त्यामुळे मला माझ्या चाहत्यांच्या थेट घरात प्रवेश मिळणार असून त्यांना चित्रांगदा एक अभिनेत्री नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून कशी आहे ते जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.Also Read : नवाजसोबत बोल्ड सीन देण्यास चित्रांगदाचा नकार??