Join us  

छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीरावांचा अपमान केल्याबद्दल अखेर निलेश साबळेने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 2:00 PM

चला हवा येऊ द्यामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या शाहूप्रेमींनी व्यक्त केली होती.

ठळक मुद्देया व्हिडिओत डॉ. निलेश साबळे म्हणत आहे की, स्कीटमध्ये दाखवण्यात आलेला फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. हा फोटो शाहू महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टींतून ही चूक झालेली असून झालेल्या प्रकाराबाबत आम्ही क्षमस्व आहोत. 

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे ही नावे आता प्रत्येकाच्या परिचयाची झाली आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचा प्रत्येक एपिसोड आवर्जून पाहिला जातो. या कार्यक्रमात मराठी आणि हिंदी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी हजेरी लावतात. नुकतेच सुबोध भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई 'विजेता' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. पण या भागात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या शाहूप्रेमींनी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करून लिहिले होते की, लोकप्रियतेची हवा डोक्यात शिरली की माणूस विक्षिप्त वागतो... या प्रकाराबाबत निलेश साबळेने जाहीर माफी मागावी असे आवाहनही त्यांनी केले होते. 

आता या वादानंतर झी मराठीने एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत निलेश साबळे घडलेल्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना दिसत आहे. तो यात म्हणत आहे की, स्कीटमध्ये दाखवण्यात आलेला फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. हा फोटो शाहू महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टींतून ही चूक झालेली असून झालेल्या प्रकाराबाबत आम्ही क्षमस्व आहोत. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून चला हवा येऊ द्या.. च्या त्या एपिसोडवर आक्षेप घेत हा छत्रपती शाहू महाराजांचा अपमान असल्याचं नेटीझन्सने म्हटले होते. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या गादीचे वंशच संभाजीराजे यांनी या कार्यक्रमातील त्या छायाचित्रावर आक्षेप घेतला होता. तसेच निलेश साबळे आणि झी वाहिनीने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी अन्यथा वाहिनी आणि दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता. 

चला हवा येऊ द्या कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे नेटीझन्स, इतिहासप्रेमी आणि शाहू महाराजांना मानणारे अनुयायी यांनी संताप व्यक्त केला होता.

टॅग्स :चला हवा येऊ द्या