Join us  

​गोठ या मालिकेतील बयोआजीचा तीन वर्षांचा फॅन...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 11:55 AM

गोठ या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री निलकांती पाटेकर बयोआजी ही भूमिका साकारत आहेत. त्यांना नुकताच या मालिकेमुळे एक खूप चांगला ...

गोठ या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री निलकांती पाटेकर बयोआजी ही भूमिका साकारत आहेत. त्यांना नुकताच या मालिकेमुळे एक खूप चांगला अनुभव आला आणि तो त्यांनी त्यांच्या फॅन्ससोबत शेअर केला आहे. त्या सांगतात, "मी कॅब बुक करत सिटीलाइट सिनेमाच्या येथे उभी होते. बरोबर एक ओळखीचे गृहस्थ होते. नेटवर्क मिळत नसल्याने मी हैराण झाले होते. समोर एक तीन वर्षांचा पिल्लू आईचा हात धरून आईला थांबवत त्याची मान उंच करून एकटक माझ्याकडे बघत होता. मी कॅब बुक करण्यात दंग होते. त्यामुळे माझे लक्षच नव्हते. त्यावर त्याच्या आईने त्याला हटकले. ती म्हणाली, चल असं बघू नये. त्याची आई त्याला घेऊन गेली तरी तो मागे बघत चालला होता. पण पुन्हा आईचा हात सोडून मागे धावत आला. त्यावर माझ्या बरोबरचे गृहस्थ म्हणाले, त्या मुलाला तुमच्याशी बोलायचंय वाटतं. मी बघितले तोपर्यंत त्याच्या बाबांनी त्याला मध्येच पकडले. बयोआजी... तो माझ्याकडे बोट दाखवताना मी पाहिलं. प्रथमच नीट निरखून त्याला पाहिले. त्याला पाहून खरे तर मी वेडीच झाले. तोंडात अंगठा. मस्त हसला माझ्याकडे बघून. मीही हसले म्हटल्यावर आई बाबा हुश्श.. ते म्हणाले, टिव्ही बघतो ना आजीबरोबर... त्यावर मी हसून म्हटले, बरोबर ओळखलं त्याने मला, मीच बयोआजी. माझा पेहराव पँट शर्ट शूज आणि मालिकेतील आजी नऊवारीतली, अंबाडा, दागिने घातलेली. खरे तर काहीच साम्य नव्हतं. पण कसे ओळखले त्याने मला... आता तर गोठमध्ये सव्वा महिना मी नव्हते. म्हणजे याच्या नजरेत बयोआजी पक्की बसली आहे. ते पिल्लू हसत होते. आई बाप गोठ बघत नव्हते हे लगेचच माझ्या लक्षात आले. पण आजी आणि हे पिल्लू... रोज गोठ बघतात. त्याने लाजत हात पुढे केला. तेवढ्यात बाबा म्हणाला, अरे नको, चिकट आहे हात. मी म्हटले, मला चालेल. मी हात मिळवला. नाव काय तुझं? विघ्नेश छूली. बोबडे बोल. मला फोटो काढायचा होता. कधी नव्हे तो. पण कॅबचे कनेक्शन गेले तर शूटिंगला जाणे गोंधळाचे झाले असते. तो मागे मागे पहात पहातच पुढे चालला होता हसत आणि आई बाबाही हसत होते. मी वेडी होऊन बघतच राहिले. उण्या पुऱ्या तीन वर्षांचे पिल्लू, त्याचे दिसणे डोळ्यातच राहिले आणि त्याचे मागे बघत हसत जाणेसुद्धा..."