Join us

​शिल्पा शिंदेनंतर सौम्या टंडन ठोकणार भाभीजी घर पर है या मालिकेला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 15:25 IST

भाभीजी घर पर है या मालिकेच्या मागे लागलेले दृष्टचक्र संपायचे नावच घेत नाहीये असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ...

भाभीजी घर पर है या मालिकेच्या मागे लागलेले दृष्टचक्र संपायचे नावच घेत नाहीये असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या मालिकेच्या निर्मात्यांविरोधात शिल्पा शिंदेने लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवल्यामुळे ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.या मालिकेला सुरुवातीला खूपच चांगला टिआरपी होता. या मालिकेत अंगुरी भाभीची व्यक्तिरेखा शिल्पा शिंदे साकारत होती. शिल्पाला प्रेक्षकांची प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. पण निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे तिने या मालिकेला रामराम ठोकला आणि तिची जागा शुभांगी अत्रेने घेतली. शुभांगीने भाभाजी या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिल्यामुळे प्रेक्षकांनी तिला या भूमिकेत स्वीकारले. त्यामुळे शिल्पाच्या जाण्याने मालिकेवर तितकासा परिणाम झाला नाही. पण आता शिल्पानंतर सौम्या टंडनदेखील ही मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. सौम्या या मालिकेत अनिता ही भूमिका साकारते. तिला मालिकेत गोरीमेम असेही म्हटले जाते. सौम्याचा या मालिकेच्या निर्मात्यांसोबत झालेला करार संपुष्टात आला असून नवीन करार बनवायचा नाही असे आता तिने ठरवले आहे. सौम्याला अनिता ही व्यक्तिरेखा साकारण्याचा आता कंटाळा आला आहे. या व्यक्तिरेखेत तोचतोचपणा आला असून नवीन काही करण्यासारखे उरलेच नाहीये असे तिचे म्हणणे असल्याचे कळतेय. तसेच सौम्याने नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरून तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. तिने नुकतेच एक ट्वीट केले आहे आणि त्यात म्हटले आहे की, भाभीजी हा एक खूपच चांगला कार्यक्रम आहे. या मालिकेच्या टीमसोबत काम करायला खूपच मजा येते. गोरीमेम या व्यक्तिरेखेवर तुम्ही नेहमीच प्रेम करत राहा.