Join us  

‘तुळसा’ या भूमिकेमुळे जगणं शिकले-अभिनेत्री आदिती द्रविड

By अबोली कुलकर्णी | Published: June 07, 2019 7:00 AM

मराठी इंडस्ट्रीत डान्सर, अभिनेत्री, गीतकार आणि गायिका म्हणून नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री म्हणजे आदिती द्रविड. भूमिकेची जाण, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि नवीन शिकण्याची धडपड आदितीमध्ये जाणवते. आता ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

 अबोली कुलकर्णी

मराठी इंडस्ट्रीत डान्सर, अभिनेत्री, गीतकार आणि गायिका म्हणून नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री म्हणजे आदिती द्रविड. भूमिकेची जाण, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि नवीन शिकण्याची धडपड आदितीमध्ये जाणवते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून तिने इशा निंबाळकर हिच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांची थाप मिळवली. आता ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या ‘तुळसा’ या व्यक्तिरेखेविषयी आणि एकंदरितच आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी तिच्यासोबत केलेली ही हितगुज...

* स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेत तू महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेस. काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी आणि कथानकाविषयी?- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट तर बरेच आले मात्र, मालिका झाल्या नाहीत. महान व्यक्तीच्या जीवनावर आधारित मालिका करायला मिळणं खरंतर एखाद्या कलाकाराचं भाग्यच म्हणावंं. त्यामुळे मला जेव्हा या मालिकेची ऑफर  आली तेव्हा मी लगेच होकार दिला. खूप चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळतो आहे. या मालिकेत मी बाबासाहेबांची मोठी बहिण ‘तुळसा’ ही व्यक्तीरेखा करत आहे. बाबासाहेब त्यांना प्रेमाने ‘आक्का’ म्हणायचे. कथानकाविषयी बोलायचे झाल्यास, बाबासाहेबांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे कुणाला काही माहिती नाही. त्यासाठीच ते लहानपणी कसे होते, त्यांची भावंडे, त्यांचं एकमेकांसोबत असलेलं बाँण्डिंग, सामाजिक परिस्थिती, त्यांचे शिक्षण हा सर्व काळ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 

* मालिकेचे वेगळेपण काय सांगशील?- खरं सांगायचं तर, बाबासाहेबांचे देशाबद्दलचे संपूर्ण कार्य आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पण, त्यासोबतच त्यांचं खासगी आयुष्य मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आले नाही. त्यामुळे आम्हाला मालिकेत जुना काळ रंगवायचा होता. त्यासाठी कलाकारांमध्ये असलेल्या साधेपणावर भर दिला गेला. कुठल्याही प्रकारचा मेकअप आमचा केला गेला नाही. आम्ही जसे आहोत अगदी तसेच आम्ही काम करतो आहोत. त्यामुळे अशावेळी फक्त अभिनयाकडेच कलाकारांचे संपूर्ण लक्ष असते. आपला अभिनय किती जास्तीत जास्त चांगला होईल याकडे ते लक्षकेंद्रित करतात. या मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर, क्रिएटिव्ह अक्षय पाटील, निर्माता आणि स्क्रिनप्ले लेखक अपर्णा पाडगावकर तसेच दशमी प्रोडक्शन हाऊस यांचे मी आभार मानू इच्छिते. यांची यामागे खूप मेहनत आहे. त्यांनी अनेक संदर्भ तपासले आहेत. इतर मालिकांप्रमाणे या मालिकेत अधिकचे काहीही दाखवता येत नाही. मला असं वाटतं त्यातच खरं यश आहे.

* तुझ्या ‘तुळसा’ या भूमिकेसाठी कोणती तयारी तुला करावी लागली? काही दडपण आहे का?- दडपण नाही. यापूर्वीही मी केलेल्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आताही मला खात्री आहे की, माझ्या ‘तुळसा’ या भूमिकेवरही प्रेक्षक तेवढेच प्रेम करतील. त्याशिवाय तयारीबद्दल सांगायचे झाल्यास, मला त्यांच्या भूमिकेबद्दल थोडा अभ्यास करावा लागला. भाषेवरही लक्ष द्यावे लागले.

* तू एक डान्सर, अभिनेत्री, गीतकार, गायिका अशा वेगवेगळया प्रकारांमधून स्वत:ला सिद्ध केलं आहेस. कोणता प्रकार तुला जास्त आवडतो?- खरंतर, हे सांगणं खूप कठीण आहे. कारण डान्सला मी माझ्या आयुष्यातील १८ वर्षे दिली आहेत. खूप मेहनत घेतली आहे. अभिनय, गायन, लेखन या सगळयांच गोष्टींवर समान प्रेम केलं आहे. कलाकार तोच असतो जो पूर्ण अर्थाने आयुष्याला जगतो आणि त्याचे वेगवेगळे पैलू अनुभवतो.

* तू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेस. कसं वाटतं जेव्हा चाहत्यांकडून असं प्रेम मिळतं तेव्हा?- चाहते हेच आम्हा कलाकारांसाठी योग्य दिशादर्शक असतात. त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर ते लगेचच त्यांची नाराजी दाखवून व्यक्त होतात. त्यामुळे आम्हालाही कळतं की आपण कसं काम केलं पाहिजे? कलाकाराच्या आयुष्यातही बरेच चढ-उतार असतात. त्यामुळे चूक-बरोबर यातील मध्य साधणं त्यालाही जमत नाही. पण, चाहत्यांकडून मिळणारी कौतुकाची थाप म्हणजे आमच्यासाठी एनर्जीचा डोस असतो.

* स्वत:साठी वेळ कसा काढतेस?- वेळ तसा मिळतच नाही. त्यामुळे मी जसा वेळ मिळेल तेव्हा मला जे आवडतं तेच करते. आई-बाबांना भेटायला पूण्याला जाते. त्यांच्यासोबत वेळ घालवला की, छान वाटतं. 

टॅग्स :अदिती द्रविडस्टार प्रवाह