Join us  

अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक; 'माझी आई काळूबाई'मधील २७ जणांना कोरोना

By तेजल गावडे | Published: September 21, 2020 3:52 PM

जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना व्हेटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे समजते आहे. त्या साताऱ्यामध्ये 'आई माझी काळूबाई' या मालिकेचे शूटिंग करत होत्या. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या साताऱ्यातल्या सेटवर कोरोनाची लागण झाली आहे. तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील काही जण बरेदेखील झाले आहेत. तर या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकरदेखील काम करत असून त्यांनादेखील कोरोनाची लागण झाल्यामुळे साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्या व्हेंटिलेटरवर आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यामध्ये मुंबईतील एक डान्स ग्रुप चित्रीकरणासाठी गेला होता. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. साताऱ्यातील लोणन या गावी शूटिंग सुरू होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे साताऱ्यातील चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. मात्र आजपासून मुंबईत मालिकेच्या शूटिंगला सुरूवात झाल्याचे समजते आहे.

 

'आई माझी काळूबाई' ही मालिका नुकतीच सोनी मराठीवर दाखल झाली आहे. या मालिकेत आशालता वाबगावकर प्रमुख भूमिकेत आहेत. तर त्यांच्याशिवाय या मालिकेत अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या काही महिन्यात बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सुबोध भावेच्या पत्नी आणि एका मुलालादेखील कोरोनाची लागण झाली होती. पण ते आता पूर्ण बरे झाले आहेत. तसेच सिंगिग स्टार या सिंगिग रिएलिटी शोमधील काही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्या सर्वांचीही प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :अलका कुबलप्राजक्ता गायकवाड