Join us  

‘Maha Minister’च्या लाख मोलाच्या पैठणीवरून वाद; नेटकरी म्हणाले, 11 लाखांची पैठणी नेसून...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 10:48 AM

Maha Minister Show:  एकीकडे 11 लाखांची पैठणी म्हटल्यावर वहिन्या खूश्श आहेत. पण दुसरीकडे काही लोकांनी 11 लाखांच्या पैठणीवरून या शोला ट्रोल करायला सुरूवात केलीये.

15 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गात लोकप्रिय असलेला ‘होम मिनिस्टर’ (Home Minister) हा कार्यक्रम आता नव्या रूपात येतोय. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) या कार्यक्रमाचं विशेष पर्व घेऊन येत आहेत. ‘महामिनिस्टर’ (Maha Minister) असं नाव असलेलं हे नवं पर्व येत्या 11 एप्रिलपासून सुरू होतंय. या पर्वात महामिनिस्टरच्या शोधात आदेश भाऊजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पैठणीचा खेळ खेळणार आहेत आणि विजेत्या वहिनींना महामिनिस्टरचा किताब आणि चक्क 11   लाखांची सोन्याची जरी असलेली पैठणी सुद्धा भेट म्हणून देणार आहे. ही पैठणी कशी असेल, याचा प्रोमो नुकताच झी मराठी वाहिनीने शेअर केला.  एकीकडे 11 लाखांची पैठणी म्हटल्यावर वहिन्या खूश्श आहेत. पण दुसरीकडे काही लोकांनी 11 लाखांच्या पैठणीवरून या शोला ट्रोल करायला सुरूवात केलीये.

‘11 लाखांची पैठणी नेसून कोणाला मिरवायचं आहे, त्यापेक्षा जिथे गरज आहे तिथे ते पैसे वापरा. लोकांना सध्या पैशांची गरज आहे. अनेक गावांत पिण्यासाठी पाणीसुद्धा नाही. उन्हाळ्यामुळे लोकांचे हाल होतायत. तुम्ही त्यांची मदत करा’, अशा शब्दांत एका युजरने सुनावलं आहे. अन्य  एका युजरनेही काहीशी अशीच प्रतिक्रिया दिली आहे. ‘11 लाखांच्या एका पैठणीऐवजी 11 लाख गरीब महिलांना साध्या साड्या वाटा,’असं या युजरने म्हटलं आहे. एका युजरने जरा चिमटा काढत, ‘ बापरे.. 11 लाखांची पैठणी कोणी चोरली तर? किंवा एखाद्याने रस्त्यावर चालताना हल्ला केला तर...?,’असा प्रश्न केला आहे. काहींनी बांदेकरांना 11 लाखांच्या पैठणीऐवजी 11 लाख रुपये रोख रक्कम देण्याचाही पर्याय सुचवला आहे.  

होम मिनिस्टर हा शो यापूर्वी संध्याकाळी 6 ते 6.30 पर्यंत झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत होता.मात्र आता या नव्या पर्वात अनेक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. सोमवार ते शनिवार महामिनिस्टर आता एक तास प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.या मनोरंजनासोबतच आता गृहिणींना तब्बल 11 लाखांची पैठणी देण्यात येणार आहे.  

टॅग्स :आदेश बांदेकरहोम मिनिस्टरझी मराठी