Join us  

प्रेमभावनेचा खट्टामिठा गुलकंद

By admin | Published: September 04, 2015 11:18 PM

एखाद्या जोडप्याचा सुखी संसार सुरू असताना अचानक एखादे वादळ यावे त्याप्रमाणे त्यांच्यात कुणाची तरी अनाहूत एन्ट्री होते किंवा त्या दोघांपैकी कुणाचा तरी भूतकाळ या सौख्यावर सावली धरतो

एखाद्या जोडप्याचा सुखी संसार सुरू असताना अचानक एखादे वादळ यावे त्याप्रमाणे त्यांच्यात कुणाची तरी अनाहूत एन्ट्री होते किंवा त्या दोघांपैकी कुणाचा तरी भूतकाळ या सौख्यावर सावली धरतो. साहजिकच, हे वादळ त्यांच्या नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते, अशा प्रकारची कथा चित्रपट माध्यमाला नवीन नाही. तरीही हा ढाचा स्वीकारायचा ठरवल्यावर मग त्याचे सादरीकरण कसे केले गेले आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. ‘तू ही रे’ हा चित्रपट अशाच एका कथेचा मागोवा घेत नात्यांची वीण घट्ट करतो आणि हे करताना खट्टामिठा असा मिश्र अनुभव देत प्रेमाचा गुलकंद सादर करतो.सिद्धार्थ, नंदिनी व त्यांची सहा-सात वर्षांची मुलगी पिऊ असे हे आनंदी कुटुंब आहे. एकमेकांवर अतिशय प्रेम करणाऱ्या या कुटुंबाचे सर्व काही सुरळीत सुरू आहे. पण एकदा सिद्धार्थच्या कंपनीत खासदार प्रतापरावांची एन्ट्री होते आणि त्यांच्या भेटीनंतर सिद्धार्थ पार कोलमडून जातो. पुढे हेच प्रतापराव त्याच्या आयुष्यात प्रताप दाखवत अशी एक ठिणगी पेटवतात, की जिची धग थेट सिद्धार्थ व नंदिनीच्या संसाराला लागते. चित्रपटाची कथा ही एवढीच आहे आणि तिच्या मांडणीतून तिची दृश्यात्मकता वाढवण्याचे काम या चित्रपटाने केले आहे.मनस्विनी लता रवींद्र्रने मूळ कथा चांगली बांधली आहे आणि अरविंद जगताप यांनी पटकथा लिहिली आहे. चित्रपटाची कथा चांगली असली, तरी पटकथेत मात्र चित्रपट दोन पावले मागे सरकतो. मध्यंतरापूर्वी चित्रपटात फार काही घडत नाही; चित्रपटाचा सगळा जीव आहे तो केवळ उत्तरार्धात ! पण त्यामुळे कथेचा तोल बिघडतो आणि तो सावरण्यासाठी थेट मध्यंतरानंतरची वाट पाहावी लागते. तसेच पूर्वार्धातले काही प्रसंग लांबले आहेत. यातला शिट्ट्यांचा प्रसंग गोड वाटत असला, तरी तो बऱ्यापैकी लांबण लावतो. चित्रपटातली नंदिनीची एन्ट्री दमदार झाली आहे; मात्र ती एखाद्या जाहिरातीप्रमाणे चित्रपटात येते. चित्रपट नेत्रसुखद वाटावा याची पुरेपूर काळजी मात्र घेण्यात आली आहे. त्यामुळे यातल्या काही त्रुटी झाकण्याची आपसूकच सोय झाली आहे. उत्तरार्धात रंग भरणाऱ्या या चित्रपटाच्या पूर्वार्धासाठी अधिक मेहनत घेतली असती, तर हा अंदाज काही औरच ठरला असता.दिग्दर्शक संजय जाधव यांनी एक मनोरंजनात्मक, पण त्याचबरोबर भावनाप्रधान चित्रपट दिला आहे. त्या अनुषंगाने चित्रपटाची बांधणी जुळून आली असली, तरी काही प्रसंगांना कात्रीचा स्पर्श व्हायला हवा होता. पण त्यांनी यात सिद्धार्थ, नंदिनी व भैरवी यांची जुळवलेली केमिस्ट्री मात्र झकास आहे. विशेषत: नंदिनी आणि भैरवीच्या भेटीचा प्रसंग उत्तम वठला आहे. अमितराज, पंकज पडघन व शशांक पोवार यांच्या संगीताने चित्रपटात बाजी मारली असून, ते नक्कीच ताल धरायला लावणारे आहे. प्रसाद भेंडे यांच्या बहारदार छायांकनामुळे चित्रपट पडद्यावर चांगला दिसला आहे. स्वप्निलने सिद्धार्थच्या भूमिकेत त्याचा लव्हरबॉयपणा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. अशा प्रकारची भूमिका अलीकडे स्वप्निलला सवयीची झाली असली, तरी त्याच्या चाहत्यांसाठी ती मेजवानी आहे. विशेष म्हणजे, कॉलेजवयीन तरुणापासून संसारात रमलेल्या गृहस्थापर्यंतची अभिनयाची रेंज त्याने यात सांभाळली आहे आणि हे त्याचे यातले वेगळेपण म्हणावे लागेल. द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या प्रसंगांतही त्याने चांगली कामगिरी बजावली आहे. सईने यातली नंदिनी टेचात साकारली आहे. विशेषत: आयुष्यात अचानक आलेल्या वळणाला धीराने सामोरी जाणारी नंदिनी तिने आत्मविश्वासाने रंगवली आहे. भैरवीच्या भूमिकेत तेजस्विनी पंडितला गोड गोड दिसण्याचेच काम अधिक आहे व तिला त्याच पद्धतीने यात पेश केले आहे. पण त्यातही तिच्या वाट्याला आलेल्या प्रसंगांत तिने भरलेले रंग लक्षवेधी आहेत. गिरीश ओक (प्रतापराव) आणि सुशांत शेलार (प्रसाद) या दोघांनी आवश्यक ते सर्व काही त्यांच्या भूमिकांतून दर्शवले आहे. छोट्या मृणाल जाधवने पिऊची भूमिका गोड रंगवली आहे. एकंदरीत आनंद, दु:ख, आपुलकी, विरह, प्रेम या व अशा विविध भावनांचे मिश्रण करत एक साधी, सरळ गोष्ट या चित्रपटाने मांडली आहे. --राज चिंचणकर