Join us

सुलतान रिलीजआधीच सुपरहिट, टिजरला एका दिवसांत ३० लाख हिट्स

By admin | Updated: April 13, 2016 14:22 IST

सुलतान चित्रपटाच्या टिझरला 12 तासांत 10 लाख तर एका दिवसांत 30 लाख हिट्स मिळाले आहेत. त्यामुळे चित्रपट रिलीज होण्याआधीच सुपरहिट होणार असल्याचं मत काही समीक्षकांनी व्यक्त केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १३ - अभिनेता सलमान खानचा चित्रपट असला की प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. त्याचप्रमाणे सलमान खानच्या आगामी सुलतान चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला. अवघ्या 12 तासांत या टिझरला 10 लाख तर एका दिवसांत 30 लाख हिट्स मिळाले आहेत. त्यामुळे चित्रपट रिलीज होण्याआधीच सुपरहिट होणार असल्याचं मत काही समीक्षकांनी व्यक्त केलं आहे. 
 
यावर्षी रिलीज होणा-या बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे सुलतान. ईदला हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटात सलमान हरियाणाचे कुस्तीपटू सुलतान अली खान यांची भूमिका साकारत आहे. यशराज  फिल्म्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. तर सलमान खानच्या नायिकेच्या भूमिकेत अनुष्का शर्मा आहे.
 
सलमान खानच्या फॅन्सना हवा असलेला सगळा मसाला चित्रपटात असल्याचं टीझरवरुन दिसत आहे. कुस्तीपटूची भुमिका असल्याने सलमान खानला शर्टलेस पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. टीझरमध्येदेखील सलमान आपली बॉडी दाखवताना दिसत आहे. त्यात कुस्तीच्या मैदानावरचा रोमांचही टीझरमधून दाखवण्यात आला आहे. 
 
महत्वाची गोष्ट म्हणजे ईदला शाहरुख खानचा 'रईस' चित्रपटदेखील रिलीज होणार आहे. बॉलिवूडचे करण - अर्जुन ईदला एकमेकांशी भिडताना दिसतील. अस असलं तरी शाहरुख आणि सलमान यांच्या मैत्रीत यामुळे काहीच फरक पडला नसून दोघेही ट्विटरवरुन एकमेकांच्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. प्रेक्षकांमध्ये शाहरुख असो वा सलमान दोघांचा तितकाच प्रेक्षकवर्ग आहे. मात्र ईदला यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल.