मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी ६ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी संध्याकाळी माहीम येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. रविवारी दुपारी २.३० ते संध्याकाळी ५ या कालावधीत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते.सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अभिनेता नाना पाटेकर, महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सुनील बर्वे, मोहन जोशी, अरुण काकडे, विजय गोखले, गिरीश पतके, दीपक करंजीकर, श्रीरंग देशमुख, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, प्रेमाताई साखरदांडे, किशोरी शहाणे, निशिगंधा वाड, सोनाली कुलकर्णी, वीणा जामकर, प्रतिमा जोशी, दिग्दर्शक गोविंद निहलानी, विजय केंकरे, राजीव नाईक, चंद्रकांत कुलकर्णी आदी मान्यवरांनी त्यांना या वेळी आदरांजली अर्पण केली. तर स्मशानभूमीत सयाजी शिंदे, नंदू माधव, प्रमोद पवार, सुलभा आर्य आदी मान्यवरांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. (प्रतिनिधी)सुलभा देशपांडे यांच्या निधनाने अभिनयाचे ‘सुप्रीम कोर्ट’ शांत झाले आहे. सुलभा देशपांडे या चतुरस्र कलावंत होत्या. विजय तेंडुलकर यांच्याकडून त्यांनी काही बालनाट्ये लिहून घेतली होती आणि ती सादरही केली होती. त्यांच्या बालनाट्य चळवळीच्या निमित्ताने त्या नाट्य परिषदेच्या संपर्कात आल्या. त्यानंतर नाट्य परिषदेशी त्यांची इतकी जवळीक निर्माण झाली की त्यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची रक्कम परिषदेकडे दिली होती. आमच्यासाठी ही मोठी दाद होती. - मोहन जोशी (अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष)
सुलभा देशपांडे अनंतात विलीन
By admin | Updated: June 6, 2016 03:00 IST