हिंदी मालिका किंवा बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावाने साडी, कुर्ती, टॉप, अनारकली, पंजाबी ड्रेस, पटियाला आणि त्यांच्या हेअरस्टाइलदेखील भाव खाऊन जातात. यामध्ये मराठी इंडस्ट्रीदेखील कशी मागे राहील? त्यात मराठी स्टाइल म्हटले की, साडीचा नंबर प्रथम लागतो. तरुणींना साडी घ्यायची असेल तर आता चित्रपट किंवा मालिकेची नावे सांगितली जातात.‘तू ही रे’ चित्रपटात तेजस्विनी पंडित या अभिनेत्रीने ‘गुलाबाची कळी’ या गाण्यातून नेसलेल्या पांढऱ्याशुभ्र अशा चमचम करणाऱ्या साडीची तरुणींमध्ये चर्चा ऐकायला मिळते. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून अक्कासाहेब म्हणजे हर्षदा खानविलकर यांचा ‘उपाडा’ या साडीतील तो रुबाबदारपणा. ‘नटसम्राट’ चित्रपटातील नेहा पेंडसे व मृण्मयी देशपांडे यांनी नेसलेल्या काठापदराच्या साड्या किंवा पैठणीसुद्धा सध्या बाजारात दिसत आहेत.म्हाळसा म्हणजेच सुरभी हांडे या अभिनेत्रीने ‘जय मल्हार’ मालिकेतील गेटअप केलेल्या साड्यादेखील भाव खाऊन जात आहेत. सध्या कॉलेजमध्ये ‘ट्रॅडिशनल डे’ला तरुणी म्हाळसा हेच पात्र धारण करून दर्शन देत आहेत. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान हिच्या असणाऱ्या विविध डार्क प्लेन व त्यांना हलकासा काठ अशा साड्या सौंदर्यात अधिक भर घालत असल्यामुळे तरुणी छोट्या-छोट्या इव्हेंटलादेखील याच साड्यांवर भर देताना दिसत आहेत. फक्त साडीमुळे एखाद्या मालिकेचे किंवा चित्रपटाचे नाव ओळखता येत असल्यामुळे दिग्दर्शकांना नवीन चित्रपटात प्रथम कोणत्या प्रकारची साडी निवडायची, हा विचार आता करावा लागेल.
स्टाइलबाज साडी...
By admin | Updated: February 8, 2016 03:06 IST