-राज चिंचणकरनाटकाच्या शीर्षकात बरेच काही दडलेले असते आणि अनेकदा त्यातून नाट्याशय सूचित होत असतो. ‘ताईच्या लग्नाला यायचं हं...’ या शीर्षकावरून जे काही जाणवते, त्यापासून हे नाटक अजिबात दूर नाही. मात्र त्यावरून हे नाटक जुन्या काळात रमणारे असेल, असा जो अर्थ ध्वनित होतो; त्याला मात्र हे नाटक कलाटणी देते. वास्तविक, यातल्या आधुनिक विचारसरणीशी या नाटकाचे शीर्षक मेळ खात नाही. मात्र या नाटकात कौटुंबिक पातळीवरचा एक चांगला विषय मांडत, पुढे सरळ रेषेत घडणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या ठरत जातात. या नाटकातल्या देसाई कुटुंबातल्या लावण्याची ही कथा आहे. लग्न करण्यापासून लावण्या सतत पळ काढत असते. त्यामुळे देसाई कुटुंब चिंतेत असते. हा गुंता लवकर सुटावा म्हणून गावाकडच्या आत्याबाईंची कथेत एन्ट्री होते आणि त्या लावण्याचे लग्न जुळवण्याची जबाबदारी स्वीकारतात. अशातच श्री या तरुणाचे स्थळ लावण्याकडे चालून येते. लावण्याचा लग्नाला नकार असला तरी काही दिवसांतच अंतरीच्या तारा जुळल्याने लावण्या व श्री यांच्या गाठीभेटी होऊ लागतात. शेवटी एकदाचा साखरपुड्याचा दिवस उजाडतो. मात्र या दिवशी अशी एक घटना घडते की लावण्याच्या मनात नव्याने प्रश्नांचे मोहोळ उठते आणि अचानक निर्माण झालेला घोळ नाटकात पुढे सुटत जातो. लेखक व दिग्दर्शक ऋषीकेश घोसाळकर यांनी एक महत्त्वाचा विषय लेखनातून मांडला आहे. लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुणीच्या मनातल्या भावनांचे प्रकटीकरण त्यांनी संहितेत केले आहे. त्याचबरोबर एका भावनिक विषयालाही त्यांनी स्पर्श केला आहे. परंतु हा विषय कौटुंबिक गोतावळ्याला प्राधान्य देत मांडल्याने, नाटकाच्या केंद्रस्थानी असलेल्या पात्राच्या अंतरंगात खोलवर डोकावणे राहून गेले आहे. तसेच ज्या महत्त्वाच्या कारणासाठी नाटकात आत्याबार्इंची एन्ट्री घडवून आणली आहे, त्यालाही पुरेशी डूब दिलेली नाही. साहजिकच, या पात्राच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकते. लावण्याचे एक स्वगतही लांबले आहे. बाकी नाटकाची एकंदर मांडणी व्यवस्थित आहे आणि यातल्या पात्रांची मनोभूमिका स्पष्ट करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.अंतरा पाटील (लावण्या) आणि विपुल साळुंखे (श्री) या नाटकातल्या जोडीने आश्वासक भूमिका रंगवल्या आहेत. अंतराने लावण्या हे पात्र साकारताना विविध विभ्रम प्रसंगानुरूप योग्य पद्धतीने सादर केले आहेत. उपेंद्र दाते यांनी गाढ अनुभवाच्या जोरावर लावण्याच्या वडिलांची भूमिका चोख साकारली आहे. संजीवनी जाधव (आत्याबाई) यांना फार काही करण्यास संहितेतच वाव नाही. मात्र त्यांच्या वाट्याला आलेले प्रसंग त्यांनी नेटके रंगवले आहेत. अजित कुंभार यांचा शेजारी आणि वेटर लक्षात राहतो. विजया महाजन व मितेश आंगणे यांची योग्य साथ नाटकाला आहे. समीर पालेकर आणि मंडळींच्या नेपथ्य निर्माणातला भाग असलेले कॉफी शॉपचे नेपथ्य देखणे आहे. दयानंद दाभोळकर (प्रकाशयोजना), अजय बोराटे (संगीत संयोजन), स्नेहल अमृते (नृत्ये) आणि गायक मंडळींची कामगिरी चांगली आहे. थोडक्यात, गंभीर विषय असलेल्या या विषयाची हलकीफुलकी मांडणी केल्याने हे नाटक बोजड होत नाही, हे या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. साहजिकच, कौटुंबिक कथेत रस असणाऱ्या रसिकांना हे नाटक अधिक जवळचे वाटू शकेल.
सरळ रेषेतले कौटुंबिक नाट्य !
By admin | Updated: February 27, 2017 02:19 IST