Join us

मसाल्यांनी ओतप्रोत

By admin | Updated: April 9, 2016 02:34 IST

दक्षिणेकडील चित्रपटांना हिंदीत डब करून प्रदर्शित करण्याचे प्रचलन जुनेच आहे. याच मालिकेत आता दक्षिणेकडील तगडा स्टार पवन कल्याणचा तेलुगू चित्रपट सरदार गब्बर सिंहला पडद्यावर उतरविण्यात आले आहे

दक्षिणेकडील चित्रपटांना हिंदीत डब करून प्रदर्शित करण्याचे प्रचलन जुनेच आहे. याच मालिकेत आता दक्षिणेकडील तगडा स्टार पवन कल्याणचा तेलुगू चित्रपट सरदार गब्बर सिंहला पडद्यावर उतरविण्यात आले आहे. तेलुगूसह हिंदीत प्रदर्शित होत असलेला पवन कल्याणचा हा पहिलाच चित्रपट आहे. दक्षिणेकडील चित्रपटांत आढळून येणारा सर्व मालमसाला या चित्रपटातही ठासून भरलेला आहे. या चित्रपटातील नायक सरदार अनाथ असतो. लहानपणापासून एक पोलीस अधिकारी त्याचा सांभाळ करतो व त्याला पोलीस निरीक्षक बनवतो. सरदारची नियुक्ती रतनपूर येथे होते. तेथे भवानीसिंहच्या (शरद केळकर) टोळीचे राज्य असते. ही टोळी लोकांवर नाही नाही ते अत्याचार करीत असते. सरदार या टोळीला आव्हान देतो. रतनपूर संस्थानची राजकुमारी अरशी (काजल अग्रवाल) हिचे डॅशिंग सरदारवर प्रेम जडते. सरदार आपल्या पद्धतीने भवानी सिंहच्या टोळीशी दोन हात करतो आणि सर्वांना शिक्षा करतो. उणिवा : दक्षिणेकडील चित्रपटात हमखास असणारे सर्व मसाले या चित्रपटातही आहेत. अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीही तशाच प्रकारची आहे. चित्रपटाच्या कथेतही नावीन्य नाही आणि हीच या चित्रपटाची प्रमुख उणीव आहे. चित्रपटाचे डबिंगही चांगले नाही. आवाज आणि दृश्यांत ताळमेळ नाही. दृश्यांची लांबी अधिक असून संपादनही कमकुवत आहे. हिंदी प्रेक्षकांनी पवन कल्याणला फारसे पाहिलेले नाही. पवनचा अभिनयही उल्लेखनीय म्हणता येणार नाही. संपूर्ण चित्रपटात त्याच्या चेहऱ्यावर एकसारखे भाव दिसतात. हीरोईन म्हणून काजलचा केवळ ग्लॅमरगर्ल म्हणून वापर करण्यात आला आहे. शरद केळकर आणि मुकेश ऋषी यांनी त्यांची पात्रे खूप भडक केली आहेत. वैशिष्ट्ये - दक्षिणेकडील मसाला चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल. या चित्रपटात मसाल्याची अजिबात उणीव नाही. पवन कल्याणचे चाहते आपल्या हीरोची अ‍ॅक्शन पाहून खूश होतील.