Join us  

प्रसिद्ध भजन गायिकेचं निधन, ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 9:57 AM

भारतातील प्रसिद्ध भजन गायिकेचं वयाच्या ६४ व्या वर्षी दुःखद निधन झालंय

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येतेय. ओडीशातील प्रसिद्ध भजन गायिका शांतीलता बारिक यांचं निधन झालंय. शांतिलता गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. अखेर सोमवारी १ एप्रिलला रात्री त्यांचं निधन झालं. शांतीलता गेल्या काही दिवसांपासून वेंटिलेटरवर होत्या. परंतु त्यांची प्राणज्योत मालवली. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शांतीलता यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. 

 शांतीलता बारीक ओडिशातील प्रत्येक घराघरात प्रसिद्ध होत्या. त्यांना बाळकृष्ण दास, मार्कंडेय महापात्रा, सिंघारी श्यामसुंदर कार आणि गोपाल पांडा यांसारख्या दिग्गजांनी प्रशिक्षण दिले. 'ठका मन चला जिबा', 'भाजी भाजी तो नाम', 'हे चकनायन', 'बळीरेणू महाबंध' अशी अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी गायली.

शांतीलता बारीक यांना भुवनेश्वर येथील उत्कल संगीत महाविद्यालयातून 'आचार्य' ही पदवी मिळाली. ओडिशा संगीत, भाषा आणि संस्कृतीत दिलेल्या योगदानाबद्दल ओडिशा संगीत नाटक अकादमीनेही त्यांचा गौरव केला. शांतीलता यांच्या निधनाने संगीतविश्वातील एक तारा निखळल्याची भावना रसिकांच्या मनात आहे.

टॅग्स :ओदिशा